नवी दिल्ली : दिवाळी सुरुवातीलाच देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. 14 ऑक्टोबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन 4.50  अब्ज डॉलरने घसरून 528.37 अब्ज डॉलर झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.


गेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 204 दशलक्षने वाढून 532.868 अब्ज झाला होता. या वर्षी ऑगस्टनंतर प्रथमच परकीय चलनाच्या साठ्यात एका आठवड्यात वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये देशाच्या परकीय चलनाचा साठा 645 अब्ज डॉलर इतका सर्वकालीन उच्चांकी स्थानी गेला.


गेल्या काही आठवड्यांपासून देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. किंबहुना वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत, आरबीआयने या परकीय चलनाच्या गंगाजळीचा एक भाग डॉलरच्या तुलनेत वेगाने घसरणाऱ्या रुपयाला हाताळण्यासाठी वापरला आहे.


विदेशी चलन मालमत्ता 2.828 अब्जने कमी 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता (FCA) 2.828 अब्ज डॉलरने घसरून 468.668 अब्ज डॉलर झाली आहे. एफसीए प्रत्यक्षात एकूण साठ्याचा मोठा भाग बनवतात. डॉलरमध्ये नामांकित परकीय चलन मालमत्तेमध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यात वाढ किंवा घट होण्याचा परिणाम देखील समाविष्ट असतो.


सोन्याचा साठाही कमी 
 
सात ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 1.35 अब्ज डॉलरने वाढले होते, तर 14 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात ते 1.502 अब्ज डॉलरने घसरून 37.453 अब्ज झाले होते. स्पेशल ड्रॉइंग राइट (एसडीआर) 149 दशलक्षने कमी होऊन 17.433 अब्ज झाला आहे. त्याच वेळी, IMF मधील देशाची राखीव स्थिती अहवाल आठवड्यात 23 दशलक्षने कमी होऊन 4.813 अब्ज झाली असल्याचं  आरबीआयने म्हटले आहे


जगात सध्या मंदीचं संकट घोंगावतं आहेत अशातच भारतासाठी हा साठा कमी होणं परवडणारं नाही त्यामुळे 1991 साली आलेल्या जागतिक मंदीची आठवण जागी होते आहे,


1991 ची जागतिक मंदी...भारताने सोने गहाण ठेवले होतं


1990-91 मध्ये आखाती युद्धानंतर हे आर्थिक संकट आले. यासाठी केवळ युद्ध जबाबदार नव्हते. अमेरिकन बँकांची वाईट स्थिती आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांच्या ढासळत्या बँकिंग प्रणालीनेही जगाला आर्थिक संकटात टाकण्यात मोठा हातभार लावला. त्याचा भारतावर खूप वाईट परिणाम झाला. 1991 मध्ये भारताच्या आर्थिक संकटाचे सर्वात मोठे कारण पेमेंटचे संकट होते. देशाचा व्यापार समतोल बिघडला. सरकार प्रचंड वित्तीय तुटीवर चालत होते. भारतीच्या परकीय चलन साठ्यात केवळ तीन आठवड्यांची आयात शिल्लक होती. सरकार कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत होते. जागतिक बँक आणि आयएमएफनेही त्यांची मदत बंद केली. पेमेंटमध्ये चूक होऊ नये म्हणून सरकारला देशाचे सोने गहाण ठेवावे लागले.