नवी दिल्ली: ईडीने आज चायनिज लोन अॅप (Chinese Loan App) संबंधित पेमेंट गेटवे असलेल्या रेजरपे (Razorpay) आणि इतर कंपन्यावर छापेमारी करत 78 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. या कंपन्यांचे व्यवस्थापन चीनी नागरिकांकडून केलं जातं असल्याचं ईडीने म्हटलं आहे. चायनिज लोन अॅप प्रकरणी बंगळुरू पोलिसांच्या सायबर सेलमध्ये अनेक संस्था आणि लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडीने शुक्रवारी बंगळुरूमधील पाच ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती आहे. ईडीने या प्रकरणी ज्या कंपन्यावर छापेमारी केली आहे त्या कंपन्यांचे व्यवस्थापन चीनी नागरिकांकडून केलं जात असून त्यामध्ये अनेक प्रकारची आर्थिक अफरातफर केली जात असल्याचं समोर आलं आहे. बोगस कागदपत्रांच्या आणि आयडी खात्यांच्या माध्यमातून ही अफरातफर केली जात आहे असं ईडीने म्हटलं आहे. ईडीने ही कारवाई मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये (Prevention of Money Laundering Act-PMLA), 2002 केली आहे.
ईडीने बंगळुरूतील पाच परिसरांमध्ये या संबंधी छापेमारी केली. यावेळी विविध मर्चंट आयडी आणि बँक खात्यांमध्ये असलेली 78 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत 95 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
चायनिज लोन अॅपच्या माध्यमातून चीनी कंपन्यांकडून भारतीयांचा डेटा चोरी होत असल्याचं समोर आलं आहे. या कंपन्यां कर्ज देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. त्याप्रकरणी ईडीने गेल्या महिन्यात कारवाई करत पेमेंट गेटवे कंपन्या असलेल्या Easebuzz, Razorpay, Cashfree या कंपन्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर आज पुन्हा रेजरपे कंपनीवर छापेमारी केली.
कोरोना काळात लोन अॅप्सच्या संख्येत मोठी वाढ
कोरोनाच्या काळात जगभरासह देशातही आर्थिक संकट निर्माण झालं होतं. या काळात लोकांना पैशाची चणचण होती. त्यामुळे नोंदणी नसणाऱ्या कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं दिसून आलं. आर्थिक चणचणीमुळे अनेक लोक या ॲप्सच्या कर्जाच्या जाळ्यात अडकले. भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) नागरिकांना या अनोंदणीकृत लोन ॲप्सपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. RBIने कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या ग्राहकांना पोलिसांत तक्रार करण्यास सांगितलं आहे.