कर्नाटक विधानसभेचं गणित
224 जागांच्या कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला 104, काँग्रेसला 78, जेडीएस 38 आणि अन्य 2 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा 112 इतका आहे.
मात्र सध्या भाजपकडे 104 आणि एक अपक्ष असे एकूण 105 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला अजूनही 7 जागा कमी पडत आहेत.
भाजपची ‘ही’ खेळी पेच सोडवणार?
भाजपकडे बहुमतासाठी सात जागा कमी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एकूण बारा आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. यामध्ये काँग्रेसचे आठ, जेडीएसचे दोन आणि दोन अपक्ष आमदारांचा समावेश आहे.
काँग्रेस आणि जेडीएसचे दहा आमदार मतदानावेळी सभागृहात अनुपस्थित असतील, तर सदस्यसंख्या 211 वर येईल आणि बहुमतासाठी 106 आमदारांची गरज असेल. भाजपकडे स्वतःचे 104 आणि दोन अपक्ष मिळून आकडा 106 होईल.
बहुमताने सरकार स्थापन करणार, काँग्रेस-जेडीएसचा दावा
काँग्रेसकडे 78 आमदार आहेत, मात्र आमदार आनंद सिंह बेपत्ता असल्याची माहिती आहे. जेडीएसनेही आपले सर्व आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. दोन अपक्षांनीही काँग्रेस-जेडीएसला साथ देण्याची घोषणा केल्याचा दावा आहे. जेडीएस आणि काँग्रेसने ठरवलेल्या रणनीतीनुसार सर्व झालं, तर बीएस येडियुरप्पा यांचा बहुमत चाचणीत पराभव होईल.
बहुमत चाचणीत काय होईल?
कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे बहुमत चाचणीकडे आता सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, सर्वात अगोदर आमदारांचा शपथविधी होईल. त्यानंतर तीन शक्यता आहेत..
एक – जे आमदार बाजू बदलण्यासाठी तयार आहेत, ते शपथविधीसाठीही गैरहजर असतील.
दोन – शपथ घेतल्यानंतर बंडखोर आमदार सभागृहातून बाहेर जातील.
तीन – सभागृहात असं वातावरण केलं जाईल, ज्यामुळे आमदारांना बाजू बदलणं सोपं होईल.
सभागृहात परिस्तिती कशी असेल, हे विधानसभेच्या अध्यक्षांवर अवलंबून आहे. बहुमत चाचणीची घोषणाही अध्यक्षच करतील. मात्र आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना Anti defection law लागू पडणार नाही का, असा प्रश्न तुमच्या मनात असेल. पण अशा परिस्थितीमध्ये आमदारांवर काय कारवाई होईल, हे नंतर पाहिलं जाईल. मात्र त्यांनी दिलेलं मत अगोदर ग्रहित धरलं जाईल. त्यामुळे समजा, काँग्रेसच्या एखाद्या आमदाराने जर भाजपला मतदान केलं, तर त्याच्या मताचा फायदा भाजपलाच होईल.
येडियुरप्पांचा पराभव झाल्यास काय?
बहुमत चाचणीत येडियुरप्पांचा पराभव झाल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर जो पक्ष बहुमत चाचणीत विजयी होईल, त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण मिळेल. बहुमत चाचणीत दोन्ही पक्षांना समान मतं मिळाली, तर विधानसभेचे अध्यक्ष मतदान करतील.
संबंधित बातम्या :