नवी दिल्ली : 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून विविध सीमांमधून राजधानी दिल्लीत प्रवेश केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. याचदरम्यान काही शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले आणि त्यांनी तिथे एक ध्वज फडकावला. या ध्वजावरुन लोकांच्या मनाता विविध शंका उपस्थित झाल्या आहेत. आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला ध्वज हा खलिस्तानचा असल्याचा दावा काहींनी केला तर काही जण हा ध्वज म्हणजे निशान साहिब असल्याचं सांगत आहेत. तसंच आंदोलकांनी तिरंगा काढून त्याच्या जागी दुसरा ध्वज लावलेला नाही, असंही अनेकांनी म्हटलं आहे.
कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली नियोजित होती. कडेकोट सुरक्षा असतानाही आंदोलक शेतकऱ्यांनी सिंघु आणि गाझीपूर सीमेवरुन दिल्लीत प्रवेश केला. परंतु आंदोलक नियोजित मार्गावरुन हटले आणि ही रॅली हिंसक बनली. परिणामी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, लाठीमार करावा लागला. काही शेतकरी आयटीओ इथल्या दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर जमले तर काही जण लाल किल्ल्यावर पोहोचले. यातल्या काही जणांनी खांबावर चढून तिथे निशान साहिब फडकावला. जाणून घेऊया निशान साहिबचा संपूर्ण इतिहास
Farmers Protest | बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम : शरद पवार
Delhi Violence Update | शेतकरी ट्रॅक्टर मोर्चातील हिंसाचारात 86 पोलीस जखमी, अनेकांवर FIR दाखल
निशान साहिब म्हणजे काय?
निशान साहिब हा सिख धर्मियांचा पवित्र ध्वज आहे. हा त्रिकोणी ध्वज कापडी किंवा रेशमपासून बनलेला असतो. याच्या टोकाला रेशमची लटकन असते. या ध्वजाच्या मधोमध खंडाचं (तलवार) चिन्ह देखील असतं. या चिन्हात दोन तलवार आणि चक्र असतं. खंडाचा रंग निळा असतो. हा ध्वज भगव्या रंगाच्या कपड्याने गुंडाळलेल्या स्टीलच्या खांबावर चढवलेला असतो. शीख धर्मियांचा विश्वास आहे की खंडा हे एक शक्तिशाली साधन आहे जे सत्याला खोट्या गोष्टींपासून वेगळे करु शकते.
असंही म्हटलं जातं की गुरु गोविंद सिंह यांनी खंडा गोड पाण्यात ढवळून त्यामधून अमृत तयार केलं होतं.
निशान साहिब हे खालसा पंथाचं पारंपरिक चिन्ह समजलं जातं. गुरुद्वाराच्या टोकावर किंवा उंचीवर हा ध्वज फडकत असल्याने तू दूरुनच पाहता येऊ शकतो. बैसाखीच्या शुभ मुहूर्तावर हा खाली उतरवला जातो. दूध आणि पाण्याने तो पवित्र केला जातो. निशान साहिबचा भगवा रंग फिका पडल्यास त्याऐवजी नवा ध्वज लावला जातो. शीख समाजात निशान साहिबचं फारच महत्त्व असल्याने तो सन्मानाने ठेवला जातो.
निशान साहिबचा इतिहास
सुरुवातीला निशान साहिबचा रंग लाल होता. परंतु नंतर याचा रंग बदलून पांढरा केला. काही काळाने तो भगवा रंगाचा करण्यात आला. 1709 मध्ये सर्वात आधी गुरु हरगोविंद जी यांनी अकाल तख्तवर भगव्या रंगाचा निशान साहिब फडकवला होता.