प्रांजल पाटीलची दृष्टी जन्मापासून कमकुवत होती, पण वयाच्या सातव्या वर्षी तिची दृष्टी पूर्णत: गेली. परंतु ती खचली नाही, आयुष्यात काहीतरी करायचं आहे, हा निश्चय करुन ती वाटचाल करत राहिली.
आपल्या पहिल्या प्रयत्नातच प्रांजलने यूपीएससी परीक्षेत 773 वं स्थान मिळवलं होतं. 30 वर्षीय प्रांजलने 2017 मध्ये आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करत 124वं स्थान मिळवलं. मग प्रशिक्षणानंतर प्रांजलने 2017 मध्ये केरळच्या एर्नाकुलममध्ये असिस्टट कलेक्ट र म्हणून आपल्या प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली.
पदवीचं शिक्षण घेताना प्रांजलने पहिल्यांदा यूपीएससीबाबत वाचलं. यानंतर तिने यूपीएससी परीक्षेसंदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच तिने आयएस अधिकारी बनण्याचं निश्चित केलं. बीए केल्यानंतर ती दिल्लीत गेली आणि जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून एमए पूर्ण केलं.
"ही जबाबदारी स्वीकारताना मला फार छान वाटत आहे. मी माझ्या कामादरम्यान हा जिल्हा अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. जिल्ह्यासाठी चांगल्या योजनाही आणेन," असं प्रांजलने पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं.
संबंधित बातम्या
अंध प्रांजलचं पुन्हा खणखणीत यश, UPSC मध्ये 124 वी रँक
UPSC रँकर प्रांजलला अंधत्वाच्या कारणाने रेल्वे सर्व्हिस नाकारली
डोळे उघडणारं यश... मराठमोळ्या प्रांजलीचा यूपीएससीतील संघर्षमय प्रवास
रेल्वे अकाऊंट सर्विससाठी ताटकळत
773 व्या क्रमाकांनुसार प्रांजलला रेल्वे अकाऊंट सर्विस देण्यात आली होती. मात्र तिच्या अंधपणाचं कारण सांगत रेल्वेने तिला ताटकळत ठेवलं. प्रांजल पाटीलची व्यथा एबीपी माझाने दाखवल्यानंतर, रेल्वे मंत्रालय खडबडून जागं झालं. प्रांजल पाटील ज्या पदासाठी पात्र झाली होती, त्याच इंडियन रेल्वे अकाऊंट सर्व्हिसमध्येच तिला रुजू केलं जाईल, असं तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं होतं.
नवी रँक, नवी पोस्ट
यानंतर प्रांजलने पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि 124वी रँक मिळवली. अंध असल्याचं कारण दाखवून जी व्यवस्था तिला तिच्या हक्काची पोस्ट देत नव्हती, त्यांच्या नाकावर टिच्चून तिने पुन्हा यूपीएससीत घवघवीत यश मिळवलं. या रँकिंगच्याच जोरावर प्रांजल आज उपजिल्हाधिकारी बनली आहे.