मुंबई : 2018 वर्षाचा पहिलाच दिवस खगोलप्रेमींसाठी पर्वणी आहे. कारण 1 जानेवारी 2018 रोजी तुम्हाला सुंदर खगोलीय घटना पाहण्याची संधी मिळणार आहे. आज रात्री सुपरमूनचं दर्शन होणार आहे.


खगोल अभ्यासक दा. कृ. सोमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी पौष पोर्णिमेला सुरुवात होईल. चंद्र पृथ्वीच्या साधारण तीन लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र आज तो तीन लाख 56 हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे.

म्हणजेच चंद्र नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त चमकदार दिसणार आहे.

भुवनेश्वर, कट्टक, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि मुंबईतून हा सुपरमून पाहता येणार आहे.

इतकंच नाही तर याच महिन्याच्या 31 तारखेला तुम्हाला ब्लू मूनचंही दर्शन होणार आहे. नासाने याबाबत माहिती दिली आहे.

ब्लू मून म्हणजे काय?
ब्लू मून म्हणजे चंद्र निळा असा विचार करत असाल तर तसं काही नाही. जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, या घटनेला 'ब्लू मून' म्हटलं जातं.

इंग्रजीमध्ये 'वन्स इन अ ब्लू मून' (Once in a blue moon) अशी म्हण आहे. ‘ब्लू मून’ ही संकल्पना एखाद्या दुर्मिळ घटनेसाठी वापरली जाते.

एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येण्याचा योग अतिशय दुर्मिळ असतो. त्यामुळे वैज्ञानिकांनी याला 'ब्लू मून' असं नाव दिलं आहे.