महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी गोंदिया जिल्ह्यात सूर्योदय होतो. छत्तीसगडच्या सीमेला लागून असणारं गोंदिया हे महाराष्ट्राचं सुरुवातीचं टोक. तिथे असणाऱ्या 1500 वर्ष जुन्या हेमाडपंथी मंदिरामध्ये नव्या वर्षाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
नाशिकमध्येही नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. नाशिकमध्ये सांस्कृतिक वारसा जपत दरवर्षी प्रमाणे यंदाही सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा रामकुंडावर पार पडला. स्वामी मित्र मेळा संस्थेच्या वतीने ठीक 12 वाजता सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला.
गोदावरीची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी नदीमध्ये हजारो दिवे सोडण्यात आले. नदीकाठच्या या सोहळ्याच्या वेळी ढोल पथकानंही आपली कला सादर केली. एकाच वेळी 9 ढोल पथकांनी एकत्रित ढोल वादन केलं.
नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातूनच नाही तर बाहेरच्या राज्यातूनही लाखो भाविक सिद्धीविनायकाच्या चरणी दाखल झाले.
मंदिर व्यवस्थापनानं भक्तांच्या आग्रहास्तव खास मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला. डोळ्याला सुखावणाऱ्या फुलांनी मंदिराची खास सजावट करण्यात आली.
शिर्डीच्या साई मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांची गर्दी झाली आहे. नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटन स्थळांप्रमाणेच धार्मिक स्थळांवरही भक्तांची मांदियाळी झाली. साईंचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये देशभरातून भाविक दाखल झाले. तर नव्या वर्षाच्या मुहूर्तावर साई मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली.
पंढरपुरात विठूमाऊलीच्या दर्शनसाठी मोठी गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर भरणा बघायला मिळतो आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरुन जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नागरिकांच्या सुख-समाधान आणि समृद्धीसाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
नवीन वर्षाचं सर्वात पहिलं स्वागत न्यूझीलंडमध्ये मोठ्या उत्साहात झालं. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोषणाई आणि आतषबाजी करुन 2018 चं स्वागत करण्यात आलं. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली.
न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातील सिडनीतही नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर आणि ऑपेरा हाऊस परिससरात नववर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. त्यानंतर दक्षिण कोरियातील सेउल शहरात नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.