मुंबई: नोटबंदीनंतर आलेल्या पहिल्या तारखेसाठी देशभरातल्या बँका सज्ज होत आहेत. नोकरदारांचे पगार बँकांमध्ये जमा झाले आहेत, मात्र पैसे असून काढता येत नसल्याने, 'खुश नही है जमाना, आज पहली तारीख है' असंच म्हणण्याची वेळ आली आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय बँकेच्या 50 हजार एटीएम मशिन्सपैकी 40 हजार मशिन्स री कॅलिबरेट झाल्याचं सांगितलं आहे.

नोटाबंदीनंतर पहिला पगार, बँका-एटीएमसमोर नोकरदारांच्या रांगा

त्यातील 38 हजार मशिन्समधून नव्या नोटा दिल्या जात आहेत. बँकेच्या सर्व एटीएममध्ये लवकरच रिफिल करण्याची व्यवस्था करण्यात येईल असं बँकेच्या उपप्रबंधक मंजू अग्रवाल यांनी सांगितलं.

नोटाबंदीच्या निर्णयाला तब्बल 22 दिवस उलटूनही पुरेशी रोकड बँक आणि एटीएममध्ये उपलब्ध नसल्यानं पगारादिवशी लोकांच्या भल्यामोठ्या रांगा बघायला मिळाल्या.

मात्र अनेक ठिकाणी एटीएममध्ये पैसे नसल्यानं लोकांची निराशा झाली. तर काही बँकांमध्ये मोजक्याच लोकांना पुरतील एवढी रक्कम होती. त्यामुळं खात्यात पगार जमा होऊनही जमाना नाखूश होता. दुसरीकडे बाजारामध्येही खरेदीचा उत्साह पूर्णपणे मावळलेला दिसतोय. कारण सुट्ट्या पैशांचा घोळ.

ज्यांना पैसे मिळतायत, त्यांना बहुतेकवेळा दोन हजाराच्या नोटा हाती लागतायत. त्यामुळं कुणी सुट्टे देता का सुट्टे असं म्हणण्याची वेळ आली आहे.

एचडीएफसीबाहेर मोठ्या रांगा

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना तर दोन- दोन दिवस रांगा लावूनही पैसे मिळत नाहीत. एचडीएफसीचे एटीएमही गेल्या चार पाच दिवसांपासून बंद असलेले दिसून येत आहेत.

याबाबत बँकेकडे विचारणा केली असता रोख रकमेचा तुटवडा सर्वच बँकांमध्ये असून बरेचसे एटीएम बंद असल्याची माहिती त्यांनी दिली.

जनधन अकांऊंटमध्ये जमा झालेल्या अमाप पैशावरही सरकारनं वेसण लावली आहे. कारण जनधनमधून 10 हजारांपेक्षा अधिकची रक्कम काढता येणार नाही.  केंद्र सरकारनं तसा निर्णय जाहीर केला आहे.

देशभरात जनधनची जवळपास 24 कोटी बँक अकाऊंट आहेत. ज्यात नोटाबंदीनंतरच्या 22 दिवसात तब्बल 64 हजार कोटी रुपये जमा झालेत. काळा पैसेवाल्यांनी आपलं धन लपवण्यासाठी या खात्यांचा वापर केल्याचं दिसतंय. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या

नोटाबंदीचा निर्णय अत्यंत धाडसी: डॉ. काकोडकर 

नोटाबंदीनंतर पहिला पगार, बँका-एटीएमसमोर नोकरदारांच्या रांगा