Omicron: दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉननं (Omicron) संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय. ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी भारताकडून कठोर पावलं उचलली जात असतानाही रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागलीय. कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्रानंतर आता राजधानी दिल्लीतही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळलाय. संबंधित रुग्ण टांझानियातून भारतात परतल्याची माहिती मिळत आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पाचवर पोहचलीय.


कोरोनाची रुग्ण संख्येत घट होत असताना देशासमोर ओमायक्रॉनच्या रुपात नवं संकट उभं राहिलंय. देशात ओमायक्रॉनचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आले. त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा एक-एक रुग्ण आढळून आलाय. आता दिल्लीत देखील ओमायक्रॉननं शिरकाव केलाय. टांझानियातून परतलेल्या व्यक्तीची ओमायक्रॉन चाचणी सकारात्मक आलीय. यामुळं सध्या देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पाचवर पोहचलीय. देशातील ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्यानं नागरिक धास्तावून गेले आहेत. 


कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतोय किंवा नाही, याबाबत डॉक्टर आणि तज्ञ जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरून अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण, ओमायक्रॉन संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे. याचबरोबर नागरिकांनी कोरोना निर्बंधांचं पालन करणं आवश्यक आहे. यातच ओमायक्रॉन व्हेरियंटच्या विरोधात भारतीयांमधील 'हायब्रिड इम्युनिटी' प्रभावी ठरेल, असा दावा सीएसआयआरकडून करण्यात आलाय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha