Covid Vaccine Dose : देशात चार ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळलेल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. बंगळुरुमध्ये दोन तर गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने देशभरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच देशासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एका दिवसात एक कोटी लसीचे डोस जनतेला देण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनीही ट्वीट करत भारतीयांचं आभार मानले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात शनिवारी एक कोटी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 127 कोटी 55 लाख 79 हजार 262 लसीचे डोस देण्यात आलं आहे. भारताने 24 तासांत 2.5 कोटी लोकांना लसीकरण करण्याचं ठरवलं आहे.
देशात 24 तासांत 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, 415 जणांचा मृत्यू
देशात गेल्या 24 तासांत 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच 415 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 99 हजार 974 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 70 हजार 530 झाली आहे. रिपर्टनुसार, आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 53 हजार 856 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव -
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या (coronavirus) संकटाची चिंता सतावत असतानाच आता कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटने (omicron variant) आणखी चिंतेत भर घातली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. सर्वात आधी कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले होते. त्यात आज गुजरात आणि महाराष्ट्राची भर पडली आहे. देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या चार झाली आहे.