Gold-Silver Price Down : सध्या लग्नसराई जोरात सुरु आहे. अशातच जर तुमच्याही घरी लग्नसोहळा पार पडणार असेल आणि त्यासाठी तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. आठवडाभरात सोनं 574 रुपयांनी (Gold Price Today) स्वस्त झालं आहे. तर चांदी 2252 रुपयांनी (Silver Price Today) स्वस्त झाली आहे.
सोमवारी 48,118 रुपये प्रति तोळा सोन्याचा दर
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात सोनं 574 रुपयांनी स्वस्त झालं असून 47,544 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच, 29 नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर 48,118 रुपये होती. अशातच बाजारातील व्यवहाराच्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी सोनं 47,544 रुपयांवर पोहोचलं होतं.
चांदी 2252 रुपयांनी स्वस्त
चांदीच्या दरांतही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. IBJA च्या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, चांदीच्या किमतींमध्ये घट पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोमवारी चांदीचे दर 63095 रुपये होते. बाजारातील व्यवहाराच्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी चांदीचे दर 60843 रुपये प्रति किलोग्राम इतके होते. त्यानुसार, चांदीच्या दरात 2252 रुपयांची घट पाहायला मिळाली होती.
55000 रुपयांवर पोहोचू शकतं सोनं
बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं जगाची धाकधुक वाढवली आहे. तसेच याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. नव्या व्हेरियंटमुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अनेक देशांमध्ये नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या वर्षभरात सोन्याचे दर 55 हजार रुपये 10 ग्राम इतके पोहोचण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :