पणजी : गोव्यातील कदंब बस स्थानकातील प्रेसिडेंटल सुपर मार्केटला लागलेली आग भडकल्याने त्याच्या वरच्या बाजूस असलेल्या आरटीओ आणि कदंब महामंडळाच्या ऑफिसला झळ बसली. आगीत सुपर मार्केटचं 80 ते 90 लाख रूपयांचं नुकसान झालं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अग्नीशमन दलाच्या 7 बंबांद्वारे आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रेसिडेंटल सुपर मार्केटबरोबर आरटीओ आणि कदंब महामंडळाच्या कार्यालयाचं आगीत नुकसान झालं. अनेक महत्त्वाची कागदपत्र या आगीत जळून खाक झाली.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, कदंब महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आलमेदा, जिल्हाधिकारी निला मोहनन यांनी घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रवाशांची जास्त काळ गैरसोय होऊ नये, शिवाय नुकसानीचा तातडीने आढावा घ्यावा, असे आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले. वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी वाहतूक खात्याच्या कार्यालयामधील महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून नुकसानीचा आढावा घेतला जात असल्याचं स्पष्ट केलं.