मुंबई : आज भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. मात्र, आजच्या या आनंदाच्या दिवसासाठी भारताच्या अनेक शास्त्रज्ञांनी मेहनत घेतली. 1963 मध्ये पहिला रॉकेट लाँच करण्याआधी त्याचे सुट्टे भाग सायकलवरून नेण्यात आला होता. तिथंपासून सुरू झालेला भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचा (Indian Space Research) प्रवास हा आता चांद्रयानापर्यंत पोहचला आहे. या प्रवासाचे स्वप्न पाहिले ते डॉ. विक्रम साराभाई यांनी...विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते.
विक्रम साराभाई यांचा जन्म गुजरातमधील एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील अंबालाल साराभाई हे प्रसिद्ध उद्योगपती होते. त्यांच्या आईचे नाव सरला देवी होते. अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर विक्रम साराभाई हे उच्च शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले. दुसऱ्या महायुद्धात ते भारतात परतले. 1947 मध्ये त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली.
विक्रम साराभाई यांनी डॉ. सी. व्ही. रमन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट पूर्ण केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी 1947 मध्ये भौतिक संशोधन प्रयोगशाळा (पीआरएल) स्थापन केली. पीआरएलची सुरुवात त्यांच्या घरापासून झाली. शाहीबाग अहमदाबाद येथील त्यांच्या बंगल्यातील एका खोलीचे कार्यालयात रूपांतर करण्यात आले. याच ठिकाणी भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमावर काम सुरू झाले. 1952 मध्ये, त्यांचे गुरू डॉ. सी. व्ही. रमण यांनी पीआरएलच्या नवीन कॅम्पसची पायाभरणी केली.
भारतात परतल्यावर विक्रम साराभाई यांनी देशाची गरज ओळखून भौतिकीची प्रयोगशाळा उभारण्याचे ठरविले. त्यासाठी मित्रांकडून आणि साराभाई कुटुंबाच्या व्यवस्थापनाखाली एका विश्वस्त निधीमधून त्यांनी पैसे गोळा केले. त्यांच्या आईवडिलांनी स्थापन केलेल्या अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या एम्. जी. सायन्स इन्स्टिट्यूटमधील काही खोल्यांमध्ये त्यांनी भौतिक शास्त्राची प्रयोगशाळा उभारली. अशा रीतीने 11 नोव्हेंबर 1947 रोजी अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना झाली. येथेच त्यांनी भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1965 मध्ये ते या प्रयोगशाळेचे संचालक झाले. त्यांनी बहुतेक संशोधन येथेच केले. किरणविज्ञान, अवकाशविज्ञान, अतिउच्च वातावरणविज्ञान आदींवर या ठिकाणी संशोधन करण्यात येत असे.
इस्रोचा पाया रचला....
ज्या वयात आपण आपले ध्येय निश्चित करू शकत नाही, त्या वयात डॉ. साराभाईंनी इस्रोसारखी संस्था स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रशियाने स्पुतनिक लाँच केले तेव्हा डॉ. साराभाई 28 वर्षांचे होते. भारतातही अंतराळ संशोधन करणारी संस्था असावी यासाठी त्यांनी सरकारच्या मागे तगादा लावला. त्यानंतर भारत सरकारने 'भारतीय अंतराळ संशोधन समिती' (INCOSPAR) स्थापन केली. पुढे याचे नामकरण भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) असे करण्यात आले.
1975 मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
1963 मध्ये पहिले रॉकेट लाँच
डॉ. विक्रम साराभाई यांनी 21 नोव्हेंबर 1963 रोजी एका छोट्या रॉकेटचे प्रक्षेपण केले. केरळमधील थुंबा या गावातील एका स्थानिक चर्चकडून जमीन घेण्यात आली. त्यानंतर त्याठिकाणी थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची (TERLS) स्थापना केली. सध्या या केंद्राला विक्रम साराभाई अंतराळ केंद्र असे नाव देण्यात आले आहे. INCOSPAR च्या स्थापनेच्या एका वर्षानंतर 1963 मध्ये भारताने अंतराळात पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण केले.
डॉ. अब्दुल कलाम यांना संधी
डॉ. विक्रम साराभाई यांनी डॉ. अब्दुल कलाम यांची केवळ मुलाखत घेतली नाही तर त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर डॉ. अब्दुल कलाम यांना वाव देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. कलाम यांनी स्वत: त्या क्षेत्रात नवोदित असल्याचे सांगितले होते. डॉ. साराभाईंनी त्यांच्याकडे लक्ष दिले आणि त्यांच्या प्रतिभेला जोपासले. डॉ. कलाम म्हणाले होते, 'प्रोफेसर विक्रम साराभाई यांनी माझी निवड मी खूप पात्र आहे म्हणून नाही तर मी खूप मेहनती आहे म्हणून केली. पुढे जाण्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. जेव्हा मी गुणवत्तेच्या बाबतीत खूप कमी होतो, तेव्हा त्यांनी मला पुढे जाण्यासाठी यशस्वी करण्यात मदत केली. मी जर अपयशी ठरलो असतो तरी ते माझ्या पाठिशी उभे असते, असे डॉ. कलाम यांनी सांगितले.
महात्मा गांधी, रविंद्र टागोर यांचा प्रभाव
साराभाई कुटुंबाचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंध असल्याने त्यांच्या घरी रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जे. कृष्णमूर्ती, व्ही. एस्. श्रीनिवास शास्त्री, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद यांसारखी मंडळी येत असे. त्यांचा प्रभाव विक्रम साराभाईंवर पडला.
विविध संस्थांचा रचला पाया....
डॉ. विक्रम साराभाई यांनी विविध संस्थांची स्थापना केली. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेची स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अहमदाबाद टेक्स्टाइल रिसर्च असोसिएशन या संस्थेची स्थापना करून भारतातील कापड उद्योगातील संशोधनाचा पाया घातला.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (अहमदाबादमधील उद्योगपतींच्या सहकार्याने उभारलेली), दर्पण ॲकॅडमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (अहमदाबाद पत्नी मृणालिनी साराभाई यांच्या सहकार्याने), स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर (अहमदाबाद साराभाई यांनी स्थापन केलेल्या सहा संस्थांचे विलिनीकरण करण्यात आल्या नंतर), इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (हैदराबाद) आणि युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (जादुगुडा, बिहार), कम्युनिटी सायन्स सेंटर (अहमदाबाद) आदी संस्था स्थापन करण्यात, त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
भारताच्या अणू संशोधन कार्यक्रमाचे जनक असलेले डॉ. होमी भाभा यांच्या निधनानंतर भारतीय अणु- ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून डॉ. साराभाई यांनी जबाबदारी पार पाडली.