दरभंगा : सायकल गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेल्या बिहारच्या ज्योती पासवानवर दु:खाचा डोंगक कोसळला आहे. ज्योतीच्या वडिलांचा सोमवारी (31 मे ) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ज्योतीच्या कुटुंबीयांनी तिच्या वडिलांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्योती पासवानच्या वडिलांच्या चुलत्याचे निधन झाले होते. सोमवारी ते गावकऱ्यांसोबत चुलत्याच्या श्राद्धाविषयी चर्चा करत होते. चर्चा संपल्यानंतर मोहन पासवान बैठकीतून उठले आणि अचानक खाली पडले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. ज्योतीच्या कुटुंबीयांनी तिच्या वडिलांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी शहरातून गावाकडे पलायन केले होते. त्यात ज्योतीचा देखील समावेश होता. अवघ्या 13 वर्षाच्या ज्योतीने त्यावेळी वडिल मोहन पासवान यांना सायकलवर बसवून गुडगाव ते दरभंगा असा आठ दिवसाचा प्रवास करत घरी आणले होते. सायकलवर तब्बल 1300 किमीचा प्रवास 13 दिवसात पूर्ण करणाऱ्या ज्योतीचे खूप कौतुक झाले. अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ज्योतीचे कौतुक केले होते.
ज्योतीचे वडील मोहन पासवान हे दिल्लीमध्ये ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते. जानेवारी 2020 मध्ये त्यांचा अपघात झाला. तेव्हा ज्योती त्यांची देखभाल करण्यासाठी वडिलांकडे आली होती. यादरम्यान,कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू झाले. रोजगार बंद झाल्याने खाण्यापिण्याची मोठी समस्या निर्माम झाली. तेव्हा केवळ 500 रुपयांना एक सायकल खरेदी करून ज्योतीने तिच्या वडिलांना सायकलवर दरभंगा येथे आणले होते.