नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाली यावर शंका असल्याचं संतापजनक वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केलं आहे.


बालाकोट हवाई हल्ल्यावर बोलताना अब्दुल्ला यांनी म्हटलं की, मोदी सरकार सर्व बाजूने अपयशी ठरलं आहेत, अनेक खासदारांचं तसं मत आहे. तसेच मोदी सरकारकडे साडेचार वर्षात काय काम केलं हे दाखवण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे मुळ मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी मोदी सरकार युद्ध सदृष परिस्थिती निर्माण करत आहे, असा आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला.


आजवर छत्तीसगडमध्ये किती भारतीय जवान शहीद झाले, त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाऊन त्यांना कधी श्रद्धांजली वाहिली का? त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवली का? त्याठिकाणी शहीद होणाऱ्या शहीदांबाबत मोदी कधी बोलले का? पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. मात्र मला शंका आहे की खरंच पुलवाला हल्ल्यात 40 जवान शहीद झाले का? असं लाजिरवाणं वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केलं.


पाकिस्तानवर हल्ला करुन आम्ही 300 दहशतवादी मारल्याचं सांगितलं जात आहे. काहीजण 500 दहशतवादी मारले गेल्याचा दावा करत आहेत. मात्र आम्ही किती धाडसी आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि यासाठी ते काहीही करु शकतात, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं. ही निवडणूक भारताच्या बचावासाठी आहे. केवळ जम्मू काश्मीरला वाचवण्यासाठी नाही. आपल्या धर्म स्वातंत्र्याचं रक्षण करायला हवं, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं.