औषध परवाना रद्द केल्याने महिला अधिकाऱ्याची हत्या, कार्यालयात घुसून गोळीबार
आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची तिच्या कार्यालयात घुसून गोळ्या घालून हत्या केल्याची घटना चंदीगडमध्ये घडली आहे.
Continues below advertisement
अमृतसर : आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची तिच्या कार्यालयात घुसून गोळ्या घालून हत्या केल्याची घटना चंदीगडमध्ये घडली आहे. नेहा शोरी असे या अधिकाऱ्याचे नाव असून पंजाब आरोग्य विभागात त्या औषध परवाना अधिकारी म्हणून काम करत होत्या. केमिस्ट दुकानाचा परवाना रद्द केल्याच्या रागातून नेहा यांची हत्या करण्यात आली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बलविंदर सिंह असे या नराधमाचे नाव असून नेहा यांच्यावर गोळीबार केल्यानंतर बलविंदरने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.
शुक्रवारी चंदीगडजवळच्या खरड येथील कार्यालयात नेहा काम करत होत्या. सकाळी पावणे बाराच्या सुमारास बलविंदर नेहा यांच्या कार्यालयात घुसला. त्याने नेहा यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिथून पळू लागला. परंतु तिथे नागरिकांनी त्याला घेरले. लोकांच्या तावडीत सापड्यानंतर बलविंदरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा यांनी 10 वर्षांपूर्वी बलविंदरच्या औषधांच्या दुकानावर छापा टाकला होता. यावेळी बलविंदरच्या दुकानात नशेची औषधे आढळली होती. त्यामुळे बलविंदरच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षांपासून बलविंदरच्या मनात या गोष्टीचा राग होता. त्यामुळेच बलविंदरने नेहा यांची हत्या केली आहे.
Continues below advertisement