नवी दिल्ली : केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर संयुक्त किसान मोर्चा अजूनही सहा मागण्यांवर ठाम आहे. त्यामध्ये एमएसपी ची हमी देणारा कायदा लागू करावा ही प्रमुख मागणी आहे. तसेच लखीमपूर हत्याकांडातले आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची आणि तातडीने अटक करण्याची ही मागणी संयुक्त किसना मोर्चाने केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुलं पत्र लिहून या प्रलंबित मागण्यांची आठवण करुन दिली आहे.
केंद्र सरकारने चर्चेच्या 11 फेऱ्यांनंतर द्विपक्षीय समाधानकारक तोडगा न काढता एकतर्फी घोषणा करुन हे कायदे मागे घेतले असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. पण यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाल्याचंही सांगितलं आहे. आता या नंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
हे तीन कृषी कायदे मागे घेणे केवळ हीच शेतकऱ्यांची एकमेव मागणी नव्हती असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सरकारने आता शेतकऱ्यांच्या पिकांना एमएसपी म्हणजे किमान हमीभावाचे गॅरन्टी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सरकारकडून प्रस्तावित वीज संशोधन विधेयक मागे घेण्यात यावं अशीही मागणी केली आहे.
काय आहेत शेतकऱ्यांच्या सहा प्रमुख मागण्या?
1. सरकारने शेतकऱ्यांना किमान हमीभाव म्हणजे एमएसपीची गॅरन्टी द्यावी.
2. प्रस्तावित वीज संशोधन विधेयक मागे घ्यावे.
3. राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणासंबंधी शेतकऱ्यांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा देण्याची तरतूद रद्द करावी.
4. दिल्ली, हरयाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि देशातील अनेक राज्यातील शेतकऱ्यांवर या आंदोलनाच्या दरम्यान खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते मागे घ्यावे.
5. लखीमपूर खेरी हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार अजय मिश्रा टेनी आज खुलेआम फिरत आहेत आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यांना मंत्रिपदावरुन हटवावं आणि अटक करावी.
6. या आंदोलनाच्या दरम्यान देशभरातील जवळपास 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिलं आहे. त्यांच्या कुटुंबाला मदत करावी आणि त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावं.
संबंधित बातम्या :
- 'सध्याची वेळ अनुकूल नाही, रद्द झालेला कृषी कायदा पुन्हा लागू होईल'
- लखीमपूरमधील शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा; प्रियंका गांधींची मागणी
- Farmers Protest : शेतकरी आंदोलनात गेल्या वर्षभरात काय झालं? जाणून घ्या या आंदोलनातील 10 महत्त्वाच्या घटना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha