Farms Law :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले. तर, दुसरीकडे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी हे कायदे पुन्हा लागू होऊ शकतात असे म्हटले होते. आता, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनीदेखील त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. सध्याची वेळ योग्य नव्हती. त्यामुळे केंद्र सरकार हे कृषी कायदे पुन्हा लागू करतील असे त्यांनी म्हटले. 


कलराज मिश्रा हे उत्तर प्रदेशमधील भदोहीमध्ये एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्याबाबत व्यवस्थित समजवून सांगण्यात अपयशी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सातत्याने धरणे आंदोलन सुरू होते. केंद्र सरकारने मनाचा मोठेपणा दाखवत हे तिन्ही कायदे मागे घेतले. सध्या वेळ अनुकूल नाही, भविष्यात पुन्हा कृषी कायदे लागू केले जाऊ शकतात. कलराज मिश्रा यांनी  पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय चांगला असल्याचे म्हटले. 


शेतकऱ्यांच्या हिताचे होते कायदे


राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी म्हटले की, हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार करण्यात आले होते. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने आंदोलन सुरू होते. त्यामुळे देशात विचित्र स्थिती निर्माण झाली होती. कृषी कायदे रद्द केल्याने ही स्थिती संपुष्टात येईल असे त्यांनी म्हटले.


साक्षी महाराज काय म्हणाले होते?


कलराज मिश्रा यांच्याआधी भाजपचे खासदार साक्षीदार यांनीदेखील कृषी कायद्यावर भूमिका मांडली होती. कायदे तयार होतात, मग मागे घेतले जातात आणि पुन्हा लागू होतात, असे साक्षी महाराज यांनी म्हटले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


अहंकाराला कोणत्याही लोकशाहीत स्थान नाही; राहुल गांधी यांचे शेतकऱ्यांना पत्र


Farmers Protest : बळीराजापुढं सरकार नमलं; 359 दिवसांचा लढा यशस्वी, ऐतिहासिक आंदोलनातील महत्त्वाचे टप्पे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha