Farmer Protest देशभरात शेतकरी आंदोन सुरु असतानाच आता संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून 6 फेब्रुवारीला 'चक्का जाम' करण्याची घोषणा केली आहे. 'भारतीय किसान युनियन' या शेतकरी संघटनेचे नेते बलबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. 6 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाअंतर्गत रस्ते अडवण्याचा इशारा त्यांनी केला.
आंदोलनस्थळी इंटरनेट बंदी, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आणि इतरही काही मुद्यांना अनुसरुन हे आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त शेतकरी मोर्चाच्याच नेतृत्त्वात मागील दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, या तिन्ही कायद्यांच्या बाबतीत चर्चा करण्याची तयारी दाखवली असली तरीही सरकारनं हे कायदे रद्द करण्याला स्पष्ट नकार दिला आहे. आतापर्यंत 11 बैठकांची सत्र होऊनही या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही.
Farmers protest | किसान मोर्चासहित अनेक Twitter अकाऊंट ब्लॉक
दरम्यान, नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शेतकरी आंदोसनावर मौन सोडत सरकारकडून शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव अद्यापही कायम असून, त्यांच्या आणि शेतकऱ्यांमध्ये एका फोन कॉलचंच अंतर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं किमान आतातरी हे मुद्दे निकाली निघणार का, या प्रश्नानं डोकं वर काढलं होतं. ज्या पार्श्वभूमीवर आता शेतकरी संघटनांनी उचललेलं देशव्यापी 'चक्का जाम'चं पाऊल आंदोलनाला कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.