नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. ज्याचे पडसाद आता सोशल मीडियावरही उमटताना दिसत आहेत. किसान मोर्चा आणि अशा अनेक ट्विटर अकाऊंटवर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्यामुळं आता ट्विटरच्या या कारवाईवरही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


30 जानेवारीला #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगचा वापर करणाऱ्या सर्व अकाऊंटवर ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत 250 अकाऊंट निलंबित करण्यात आली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आलेल्या मागणीनंतर ही कारवाई करण्यात आली. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेच्या कामात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं.

Budget 2021 | एका क्लिकवर पाहा 2021च्या अर्थसंकल्पातील 21 महत्त्वाचे मुद्दे

किसान एकता मोर्चा/ किसान मोर्चाचाही या ब्लॉक करण्यात आलेल्या अकाऊंटमध्ये समावेश आहे. या अकाऊंटवरुन शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं म्हणणं मांडलं जात असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान देशाच्या प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दुसऱ्याच दिवशीही ट्विटरकडून अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.