Budget 2021 देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी, 1 फेब्रुवारी 2021ला अर्थसंकल्प सादर केला. लाखो आणि कोट्यवधींच्या तरतुदींसह काही महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून केल्या. कृषी अधिभार, इनकम टॅक्स स्लॅबमध्ये शून्य बदल या साऱ्यामुळं यंदाचा अर्थसंकल्प चर्चेचा विषय ठरला. त्यातच विरोधकांनी या अर्थसंकल्पामुळं केंद्र सरकारवर आणि अर्थमंत्री सीतारमण यांच्यावर निशाणा साधला.


राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एका व्हायरल व्हिडीओचा आधार घेत अत्यंत मिश्किल अंदाजात अर्थसंकल्पावर टीका केली. चव्हाणांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा पाढे म्हणताना दिसत आहे. पण, त्याचा पाढे म्हणण्याचा अंदाज मात्र वेगळा आहे. क्रमवारी, आकडेमोड आणि स्पष्ट उच्चार या कशाचाही ताळमेळ नसल्यामुळं अगदी रेल्वेगाडी सुटावी तसा हा मुलगा सुस्साट अगदी कमाल आत्मविश्वासानं पाढे म्हणत आहे. आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ विनोदी अंगानं व्हायरल झाला. पण, चव्हाणांनी त्याच्याच मदतीनं थेट देशाच्या अर्थमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.


'ताळमेळ नसलेले पाढे म्हणणारा हा चिमुरडा आणि ताळमेळ नसलेला अर्थसंकल्प मांडणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री, या दोघांकडेही होमवर्कचा अभाव असला तरी आवेश मात्र अफलातून आहे', असं म्हणत परिस्थितीचा आढावा न घेता अर्थसंकल्प सादर केल्याचा नाराजीचा सूर त्यांनी आळवला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी याबाबत आपले स्पष्ट विचारही मांडले.


Budget 2021 | अर्थसंकल्पाचे सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम; जाणून घ्या सध्याचे दर


'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या. पण केंद्र सरकारने दिशाहिन अर्थसंकल्प मांडून कोरोना आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पिचलेल्या सर्वसामान्यांची, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि उद्योजकांची आणखी पिळवणूक करण्याचे काम केले आहे', असं ट्विट त्यांनी केलं.








मोदी सरकारनं सहा महत्त्वाच्या विभागांवर अर्थसंकल्पातून लक्ष केंद्रीत केल्याचं सांगितलं. पण, चव्हाणांनी केंद्राचा अर्थसंकल्प नेमका कोणत्या धोरणांवर आधारलेला आहे, याबाबतचे मुद्दे मांडत टीकास्त्र सोडलं.


आजचा केंद्रीय अर्थसंकल्प आणि मोदी सरकारची एकंदर आर्थिक धोरणे खालील सहा स्तंभांवर आधारित आहेत, असं लिहित त्यांनी निवडक भांडवलदारांचा आर्थिक विकास, शेतकरी, व्यापाऱ्यांची शारीरिक आणि आर्थिक पिळवणूक, विधानसभा निवडणूक केंद्रीत निवडक विकास, मनुष्यबळाचे खच्चीकरण , अर्थव्यवस्था उद्ध्वस्त आणि नष्ट करण्याची पुनरावृत्ती, कमाल आश्वासने किमान कामगिरी या साऱ्याचा उल्लेख केला.