नवी दिल्ली : आरएसएस सोडून या देशात सर्वजण दहशतवादी आहेत?, तुम्ही देशाच्या पाठीचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांचीच ही दूरवस्था करत आहात, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला. सोबतच दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरही सडकून टीका केली.


'सरकार किल्लाबंदी का करत आहे? सरकार शेतकऱ्यांना घाबरतं का? शेतकरी देशाची ताकद आहेत. त्यांना दाबण, मारणं आणि धमकावणं सरकारचं काम नाही. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचं काम करावं. शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन करणं हे देशासाठी योग्य नाही', अशा शब्दांत त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या केंद्राच्या भूमिकेची निंदा केली.





जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे. तुमचं काम आहे त्यांच्या हिताचा विचार करणं. या एक टक्के लोकसंख्येसाठी तुम्ही देश विकू शकत नाही. अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पावलोपावली मोदी सरकारला निशाण्यावर घेतलं. 'मी शेतकऱ्यांना चांगलं ओळखतो ते कुठंही जाणार नाहीत अखेर एक दिवस सरकारलाच मागे हटावं लागेल. त्यापेक्षा आताच माघार घ्या', अशा इशाराच त्यांनी दिला.


गुजराती बांधवांसाठी शिवसेनेकडून रासगरब्याचं आयोजन; उद्योजक- व्यावसायिकांच्या हाती येणार शिवबंधन


शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवर टाळाटाळ करण्याची गरज नसून पारदर्शी आणि स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आता आली आहे, असं म्हणत शेतकऱ्यांप्रती सरकारच्या निर्णयांवर त्यांनी निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच या आंदोलनाबात त्यांचं मौन सोडत प्रतिक्रिया दिली होती. यावरही त्यांनी निशाणा साधला.


देशाचा अर्थसंकल्प 1 टक्के जनतेलाच आधार देणारा


नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबत त्यांनी नाराजीचा सूर आळवला. देशाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून 99 टक्के जनतेला आधार दिला जाणं अपेक्षित होतं. पण, इथं मात्र 1 टक्के जनतेलाच आधार मिळत आहे. मध्यमवर्गीय जनता, कामगार, शेतकरी यांच्या वाट्याचा पैसा ठराविक अशा 10-15 लोकांच्याच वाट्याला गेला. इथं देशाच्या सरकारकडून जनतेच्या हातात पैसा दिला जाण्याची गरज होती. लघुउद्योजकांना आर्थिक पाठबळ देत अर्थव्यवस्थेला गती दिलं जाण अपेक्षित होतं. पण, इथं मात्र उलट चित्र पाहायला मिळालं असं म्हणत त्यांनी रुतलेल्या अर्थचक्राकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं.


चीन मुद्द्यावरही प्रतिक्रिया


चीनकडून देशाच्या भूभागात वारंवार घुसखोरी केली जात असताना संरक्षणार्थ तुटपूंज्या रकमेचीच तरतूद केंद्रानं केल्याची बाब अधोरेखित करत राहुल गांधी यांनी जर संरक्षण यंत्रणा देशाप्रती सर्वस्व अर्पण करत असतील तर इथं सरकारकडून 110 टक्के समर्पकता दाखवली गेली पाहिजे असा सूर आळवला. संरक्षण यंत्रणांच्या मागण्या आणि अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजेत यावर ते आग्रही दिसले.