नवी दिल्ली : नोटाबंदीचा मोठा फटका शेतीक्षेत्राला बसला असल्याची कबुली कृषी मंत्रालयाने अखेर दिली आहे. या संबंधी केंद्रीय कृषी मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाच्या स्थायी समितीला एक अहवाल सादर केला, त्यात याचा उल्लेख असल्याचे 'द हिंदू'ने म्हटले आहे.

खरीपाची काढणी, विक्रीची लगबग आणि रब्बी पेरण्यांची घाई सुरु असतानाच नोटाबंदी जाहीर झाली होती. हे दोन्ही व्यवहार नगदीने होत असतात. त्याचवेळी नोटाबंदीने बाजारातून रोकड गायब केली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

नोटाबंदीनंतर लाखो शेतकऱ्यांना रब्बीसाठी खते, बियाणे खरेदीलाही पैसे नव्हते. अनेक मोठ्या बागायतदारांना सुद्धा रोजंदारीच्या मजुरांना द्यायला तसेच आंतरमशागतीच्या कामासाठी पैसे नव्हते असे हा अहवाल सांगतो. विशेष म्हणजे, नोटाबंदीनंतर दोन वर्षात पहिल्यांदाच सरकारने ही बाब मान्य केली आहे.

वित्त मंत्रालयाच्या संबंधित स्थायी संसदीय समितीला दिलेल्या अहवालात कृषी मंत्रालयाने नोटाबंदीने शेतकऱ्यांवर वाईट परिणाम झाल्याचे म्हटले आहे. नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांना नगदी पैशांची अडचण आल्याने शेतकरी रब्बी आणि खरीपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे आणि खते देखील खरेदी करू शकले नाहीत, असे अहवालात म्हटले आहे.

कृषी मंत्रालयाने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे की, शेतकरी त्यांची खरीप पिके विक्रीला काढत असताना आणि रब्बी पिकांची पेरणी करत असतांना हा निर्णय घोषित झाला होता. शेतकऱ्यांना या काळात खरीप पिकांची विक्रीची प्रक्रिया आणि रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम हवी होती, मात्र या निर्णयाने शेतकरी वर्ग अडचणीत आला.

भारतातील 263 दशलक्ष शेतकरी प्रामुख्याने रोख अर्थव्यवस्थेवर आधारीत आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे. लाखो सामान्य शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे मिळाले नाहीत. सोबतच मोठ्या शेतकऱ्यांना देखील अनेक समस्या आल्या. मजुरांना दररोज वेतन देण्यासह उत्पादनवाढीसाठी देखील त्यांना अडचणी आल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच वृत्ताचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने देखील नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्याचे कबूल केले आहे, शेतकऱ्यांवर निर्णयाचा मोठा परिणाम झाला आहे.  राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, नोटाबंदीने कोट्यवधी शेतकऱ्यांचे जगणे कठीण केले आहे. आता त्यांच्याजवळ बी-बियाणे, खते खरेदीसाठी देखील पैसे नाहीत. परंतु आज देखील मोदीजी शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत.