Farm Laws : पंतप्रधान मोदींनी देशात नव्यानं लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. तब्बल वर्षभरापासून बळीराजा या कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमांवर लढा देत होता. अखेर त्यांचा लढा यशस्वी ठरला. अशातच कायदे मागे घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळं आज संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या वतीनं 'शेतकरी विजय दिवस' साजरा करण्यात येणार आहे. त्यासोबतच ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीनं सभांचं आयोजनही करण्यात आलं आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी तिनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला होता. परंतु, कायदे जोपर्यंत संसंदेत रद्द होत नाहीत, तोपर्यंत आपल्या आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतलेला आहे. 


कृषी कायदे रद्द करण्यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात योग्य ती कायदेशीर उपाययोजना करण्यात येईल, असे ते म्हणाले. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाळ यांनी सर्व राज्य घटकांना 20 नोव्हेंबर रोजी राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर कॅन्डल मार्च काढण्यास सांगितले आहे, आपल्या हक्कांसाठी लढताना मोर्चे आणि आंदोलनांमध्ये प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ 'शेतकरी विजय दिवस' साजरा केला जाईल, असंही सांगितलं आहे. 


बळीराजापुढं सरकार नमलं; 359 दिवसांचा लढा यशस्वी


मी तिनही कृषी कायदे मागे घेतोय... असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिनही कृषी कायदे मागे घेतले. गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं मोदींनी ही मोठी घोषणा केली. मोठी घोषणा करताना मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. गेल्या दीड वर्षाहून जास्त काळ कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. तब्बल 359 दिवस शेतकऱ्यांनी राजधानीच्या सीमेवर आपला लढा सुरु ठेवला. आज अखेर त्यांच्या लढ्याला यश मिळालं. केंद्र सरकारसोबत बैठकांवर बैठका झाल्या, मात्र बळीराजा काही झुकला नाही. तो आपल्या मागण्यांवर ठाम होता. दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन अनके टप्प्यांमधून गेलं. 


काय म्हणाले मोदी...? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :