मुंबई : ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाला तरी आता चिंता करण्याचं कारण नाही. कारण आता अशा व्यवहारात रिफंड मिळेपर्यंत दर दिवशी शंभर रुपये बँक ग्राहकाला देणार आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेनं परिपत्रक जारी केलं आहे.
तुमचा ऑनलाइन व्यवहार काही कारणास्तव अयशस्वी झाल्यास आता ग्राहकांना जर एक दिवसाच्या आत ते पैसै तुम्हाला परत मिळाले नाहीत तर दरदिवशी 100 रुपये मिळणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. UPI, IMPS, NACH द्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू आहे.
रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार निश्चित वेळेत फेल रकमेचे पेमेंट होत नसेल तर बँकांना संबंधित ग्राहकास प्रतिदिन 100 रुपयांच्या हिशेबाने दंड द्यावा लागेल. ग्राहकांना या नियमानुसार लाभ न मिळाल्यास रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकतात. हा नियम 15 ऑक्टोबर 2019 पासून लागू होणार आहे, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.
आरबीआयने ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्यास संबंधित टर्न अराउंड टाइम (टीएटी) नियमांत बदल केला आहे. या बदलानंतर बँक ग्राहकांना फेल ट्रान्झॅक्शनच्या पैशांसाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, अशा प्रकरणांची स्वत:हून दखल घेत ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा होतील. बँकांना तक्रारीविना ग्राहकांना पैसे परत करावे लागतील. बँकांकडे तक्रार केल्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने एटीएम आणि अन्य इलेक्ट्रिक देय व्यवहार निष्फळ झाल्यानंतर बँकांसाठी ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा अवधी निश्चित केला आहे. बँक खात्यातून पैसे कापले जात असतील आणि एटीएममधून रोकड मिळत नसेल तर अशा प्रकरणांत बँकेस ट्रान्झॅक्शनच्या पाच दिवसांच्या आत ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील.
डिजीटल व्यवहारांव्यतिरिक्त आरबीआयने नॉन-डिजीटल ट्रान्झॅक्शन्ससाठीही वेळेची मर्यादा आखून दिली आहे. एटीएम आणि मायक्रो एटीएममध्ये अयशस्वी झालेल्या व्यवहारांसाठी खात्यात पैसै येण्यास पाच दिवसांपर्यंतची मर्यादा आखण्यात आली आहे. त्यानंतर दररोज 100 रुपये दंड बँकांना द्यावा लागेल. ही दंडाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात त्वरीत पोहोचायला हवी, ग्राहकांनी तक्रार करण्याची वाट बँकांना पाहू नये, असंही आरबीआयने परिपत्रकात नमूद केलं आहे.
ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्यास रिफंड मिळेपर्यंत ग्राहकाला दर दिवशी शंभर रुपये, आरबीआयचे निर्देश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2019 05:20 PM (IST)
तुमचा ऑनलाइन व्यवहार काही कारणास्तव अयशस्वी झाल्यास आता ग्राहकांना जर एक दिवसाच्या आत ते पैसै तुम्हाला परत मिळाले नाहीत तर दरदिवशी 100 रुपये मिळणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. UPI, IMPS, NACH द्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -