नवी दिल्ली : फेसबुकची पोस्ट लाईक करा आणि प्रत्येक लाईक मागे 5 रुपये मिळवा. सोशल मीडियाद्वारे पैसे कमवण्याची ही अशी भन्नाट स्कीम काढून नोएडातील 26 वर्षीय अनुभव मित्तल या महाठगाने 7 लाख लोकांना तब्बल 3 हजार 700 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
एसटीएफने चार दिवसांपूर्वी अब्लेझ इन्फो सोल्यूशन नावाच्या कंपनीचा मालक अनुभव मित्तलला अटक केल्यानंतर या महाघोटाळ्याचा खुलासा झाला होता. अनुभव सध्या तुरुंगाची हवा खात आहे.
काय होती ही स्कीम?
या स्कीममध्ये गुंतवणूकदारांकडून 5 हजार 750 रुपये ते 57 हजार 500 रुपयांची गुंतवणूक करुन घेतली जायची. गुंतवणुकीनंतर प्रत्येक गुंतवणूकदाराला सोशल मीडियावर अकाऊंट ओपन करुन दिलं जायचं. कंपनीने सांगितलेल्या पोस्टना लाईक करण्यास सांगितलं जायचं आणि मग प्रत्येक लाईकमागे 5 रुपये या हिशेबाने पैसे गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा व्हायचे. प्रत्येक मेंबरला आणखी दोन गुंतवणूकदार आणणे अनिवार्य होते.
काय आहे घोटाळा?
'सोशलट्रेडडॉटबीज' या पोर्टलच्या यूआरएलवर क्लिक करा आणि पैसे मिळवा अशी योजना अनुभव मित्तलने सुरु केली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना सभासद करुन त्यांच्याकडून ठराविक रक्कम घेतली जात असे. सभासदांनी आणखी सभासद आणल्यास जास्त पैशांचं आमिष दाखवलं जायचं. सभासदांच्या मोबाईलवर दररोज 5 ते 125 बनावट यूआरएल पाठवले जायचे. एका यूआरएलला क्लिक करण्यासाठी सभासदाला 5 रुपये मिळत असत.
सुरुवातीला अनुभव मित्तलने व्यवस्थित परतावा दिल्याने अनेक जण योजनेत सहभागी झाले. मात्र नंतर पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. यानंतर अनेकांनी केलेल्या पोलिस तक्रारीत महाघोटाळ्याचा पर्दाफाश झाला.
कोण आहे अनुभव मित्तल?
अनुभव मित्तल हा गाझियाबाद जवळच्या पिलखुआ या छोट्या गावातला रहिवासी आहे. एका साधारण कुटुंबात जन्मलेला अनुभव हा दहावी आणि बारावी बोर्डात पहिला आला होता. कॉलेजमध्ये त्याला मित्र '3 इडियट्स'च्या फुंगसुक वांगडूची उपमा द्यायचे. 2010 मध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षातच त्यानं कंपनी सुरु केली. इंजिनियरिंगनंतर अनुभवने आपलं संपूर्ण लक्ष कंपनीत घातलं. अनुभवने पत्नी आयुषी मित्तललाही या कंपनीची संचालक केलं. नोएडामध्ये कंपनीसाठी 4 मजली इमारतही खरेदी केली. कंपनीत लाखो रुपये पगार देऊन 50 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या. सुरुवातीलाच त्याला 350 कोटी रुपयांच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं काम मिळालं.
अचानक झालेल्या धनलाभाने अनुभवने मोठी उडी घेतली. सोशल ट्रेड सेक्टरमध्ये कंपनी सुरु केली आणि एका वर्षात अनुभव मित्तल हजारो कोटींमध्ये खेळू लागला. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी गेल्याच वर्षी अनुभवने आपल्या वाढदिवसाला जंगी पार्टी दिली. या पार्टीला फिल्म स्टार सनी लिओनी आणि अमिषा पटेलही हजर होती.
परदेशातही घोटाळ्याची पाळंमुळं
आतापर्यंत एकूण 16 जणांना पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घोटाळ्याची पाळंमुळं फक्त देशातच नाही तर परदेशातही पसरली होती. मस्कत, नायजेरियामधील अनेकांनी पैशांच्या आमिषामुळे या कंपनीत पैसे गुंतवले होते.
अनुभवच्या समर्थनार्थ ऑनलाईन पोल!
दुसरीकडे 'सोशलट्रेडडॉटबीज'वर पैसा लावणारे लोक आरोपी अनुभव मित्तलच्या समर्थनार्थ उतरले आहेत. यासाठी लोकांनी ऑनलाईन पोल सुरु केला आहे. अनुभव बरोबर आहे की चुकीचा या प्रश्नाला हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं आहे.
अनुभवच्या संपत्तीवर ईडीचे छापे
अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी अनुभव मित्तलवर गुन्हा दाखल करुन त्याच्या नोएडा, गाझियाबाद आणि कानपूरमधील पाच ठिकाणांवर छापा टाकला आहे. या छाप्यात कोट्यवधींच्या संपत्तीचे कागदपत्र मिळाल्याचं कळतं. आता ईडी अनुभवची संपत्ती जप्त करण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन ज्या लोकांचे पैसे गुंतले आहेत, ते बाहेर काढता येईल.
इतकंच नव्हे तर नोटाबंदी दरम्यान अनुभव मित्तलच्या कंपनीने दोन कोटी रुपयांची रोकड गाझियाबादमधील अॅक्सिस बँकेच्या राजनगर शाखेत जमा केली होती.
उरलेल्या 3200 कोटी रुपयांचं काय झालं?
या घोटाळ्याचा मास्टरमाईंड अनुभव मित्तल अटकेत आहे. त्याच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीधर प्रसाद आणि महेश दयाल अशी इतर दोघांची नावं आहेत.
520 कोटी रुपये जमा असलेलं अनुभव मित्तलचं अकाऊंटही फ्रीज करण्यात आलं आहे. पण उरलेल्या 3200 कोटी रुपयांचं काय झालं? हा प्रश्न कायम आहे.
लोकांना लोकांशी जोडण्यासाठी मार्क झुकरबर्गने फेसबुक बाजारात आणलं. त्यातून तो मालामाल झाला, हे खरंय. पण त्याच फेसबुकच वापर करुन लोकांना गंडा घालणारे महाभाग आपल्या देशात निर्माण झाले आहेत.