लखनऊ : उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आले असतानाच या निवडणुकीतील उमेदवारांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यूपीतील विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे तब्बल 302 उमेदवार कोट्यधीश तर 143 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.


उत्तर प्रदेशात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 11 फेब्रुवारीला होईल. ज्या 73 जागांसाठी 11 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, त्याठिकाणच्या उमेदवारांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अर्थातच एडीआरच्या रिपोर्टनुसार पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवणारे 302 उमेदवार हे कोट्यधीश आहेत. यात बहुजन समाज पक्षाचे सर्वाधिक 66 उमेदवार आहेत. तसंच कोट्यधीश उमेदवारांमध्ये भाजपच्या 61 तर सपाच्या 40 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या 18 उमेदवारांची संपत्तीही कोटींच्या घरात आहे.

यूपीच्या विधानसभेत 143 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, ज्यांच्याविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, महिलांशी गैरवर्तन यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात भाजपच्या 73 पैकी 29, बीएसपीच्या 73 पैकी 28, सपाच्या 51 पैकी 15 आणि काँग्रेसच्या 24 पैकी 6 उमेदवारांचा समावेश आहे.