Face Mask Mandatory : देशात कोरोनाची साथ वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने आता विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (DGCA) आदेश दिले आहेत
मास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल. हा नियम पायलट, हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट यांनाही लागू आहे.
दिल्ली, पंजाबमध्येही मास्कसक्ती
राजधानी दिल्ली, पंजाबमध्येही मास्कसक्ती करण्यात आली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने कोरोना नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालय तसेच इनडोअर आणि आउटडोअर बैठक, मॉल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या समारंभाचं आयोजन करु नका, गर्दी टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.
देशातील स्थिती काय?
देशात मंगळवारी दिवसभरात 9,062 नवीन कोरोना रुग्णांनी नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेनं कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण आढळले आहेत. दुसरी चांगली बाब म्हणजे नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 15 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 15 हजार 220 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत एकूण 4 कोटी 36 लाख 54 हजार 64 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात मंगळवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 25 लाख 90 हजार 557 डोस देण्यात आले आहेत.