India's Foreign Minister On Russian Oil: रशियाकडून तेल विकत घेणे हे भारताचे कर्तव्य असल्याचं परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले आहेत. जे देश रशियासोबत व्यवसायिक संबंध संपवावे, म्हणून दबाव भारतावर देत होते, त्यांना आता जयशंकर यांनी थेट संदेश दिला आहे. आधी देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.


परराष्ट्र मंत्री जयशंकर (Foreign Minister) म्हणाले की, जर युरोप मध्य पूर्व आणि इतर स्त्रोतांकडून तेल खरेदी करत असेल तर भारतालाही सर्वोत्तम कराराची खात्री करण्याचा अधिकार आहे. 16 ऑगस्ट रोजी बँकॉकमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधताना एका प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्र्यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर टीका होत आहे. या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्यांना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या या निर्णयाला त्यांनी पूर्णपणे समर्थन दिले आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बँकॉकमधील भारतीय समुदायाशी संवाद साधताना सांगितले की, वाढत्या ऊर्जेच्या किमती कमी करण्यासाठी प्रत्येक देश सर्वोत्तम व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतही तेच करत आहे.


परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जगभरातील देशांना हे स्पष्ट केले आहे की,  भारताने हा निर्णय स्वतःच्या बचावासाठी घेतलेला नाही. ते म्हणाले की, भारत नेहमीच आपल्या हितासाठी स्पष्ट भमिका घेत आला आहे. ऊर्जेच्या वाढलेल्या किमती  (High Energy Prices) भारतीय लोकसंख्येला परवडत नाहीत. जयशंकर म्हणाले, माझ्याकडे 2000 डॉलर्स दरडोई उत्पन्न असलेला देश आहे. वाढलेल्या ऊर्जेच्या किमती परवडणारे हे लोक नाहीत. त्यामुळे त्यांना सर्वोत्तम डील मिळून देण्याची खात्री करणे ही माझी जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य आहे. अमेरिकेसह इतर देशांना भारताची ही स्थिती चांगलीच ठाऊक आहे आणि तेही यात भारताला पाठिंबा देणार असल्याचे ते म्हणाले.


दरम्यान, याआधीही अनेकवेळा परराष्ट्र मंत्री रशियाकडून तेल आयात करण्याच्या भारताच्या निर्णयाच्या बचावासाठी सार्वजनिक व्यासपीठावर आले आहेत. एप्रिलमध्ये अमेरिकेत ते म्हणाले होते की, भारताची रशियाकडून महिन्याभरात होणारी तेल खरेदी युरोपपेक्षा कमी आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेत झालेल्या टू प्लस टू (2+2) मंत्रिस्तरीय चर्चेदरम्यान त्यांनी हे सांगितले. रशियाने फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला केल्यापासून रॉयटर्सच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये रशियाकडून भारताची तेल खरेदी प्रतिदिन सुमारे 950,000 बॅरल इतकी विक्रमी वाढ झाली आहे.