12th November In History : आजचा दिवस भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 1969 साली इंदिरा गांधी (Indira Gandhi) या पंतप्रधान असताना त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती. पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांनी विरोधी अपक्ष उमेदवार, व्ही व्ही गिरी यांना त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीत मदत करून निवडून आणलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधी यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदावरून हकालपट्टी केली होती. त्याचसोबत पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. 


1880: सेनापती बापट यांचा जन्म


सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक आणि लढाऊ समाजसेवक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट (Senapati Pandurang Mahadev Bapat) यांचा जन्म आजच्याच दिवशी 1880 साली झाला होता. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1967 साली झाला. 


1896 : पक्षीप्रेमी सलीम अली यांचा जन्म (Salim Ali Birth Anniversary) 


प्रसिद्ध भारतीय पक्षीप्रेमी सलीम अली यांचा 1896 साली जन्म झाला. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षी तज्ञ होते. त्यांचे कार्य पक्षी विज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा समजला जातो. सलीम अली यांचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सलीम मोइनुद्दीन अब्दुल अली असे होते. ते एक वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे तर त्यानंतर दोन वर्षांनी आईचे निधन झाले. त्यांचे मामा अमीरूद्दीन तय्यबजी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांचा पक्षी अभ्यास खूप मोठा होता, त्यावर त्यांनी अफाट लेखन केलं. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे किताब दिले, तसेच त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. तामिळनाडू राज्यात कोईमतूर येथे त्यांच्या नावाने द सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्टरी (SACON) ही संस्था सुरू करण्यात आली आहे.


1904 :  समाजवादी, कामगार नेते एस. एम. जोशींचा जन्म


समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी ( S M Joshi) यांचा जन्म आजच्याच दिवशी 1904 साली झाला. ते एक निष्ठावंत समाजवादी नेते आणि कामगार पुढारी होते. 'एसेम' या नावाने ते परिचित आहेत. त्यांचा जन्म जुन्नर (पुणे) येथे मध्यम वर्गीय कुटुंबात झाला होता. काही आंदोलनांमध्ये त्यांना अटक होऊन शिक्षाही झाली. या काळात त्यांनी मार्क्सचे विचार व समाजवाद यांचा अभ्यास केला आणि ते समाजवादी बनले.  त्यांनी विपुल प्रमाणात लिखाण देखील केले आहे. 1957 मध्ये ते मुंबई विधानसभेवर निवडून आले आणि 1963 मध्ये प्रजा सामाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. पुढे संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली.  


1918 : ऑस्ट्रिया हा देश प्रजासत्ताक बनला 


आजच्याच दिवशी, 1918 साली ऑस्ट्रिया (Austria) हा देश प्रजासत्ताक देश बनला. ऐतिहासिक काळापासून युरोपाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे स्थान असलेला ऑस्ट्रिया बहुतेक सर्व मोठ्या युद्धांना सामोरा गेला आहे. ऑस्ट्रियाने जर्मन साम्राज्याच्या चिथावणीखाली येऊन सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले ज्याचे रूपांतर झपाट्याने पहिल्या महायुद्धात झाले. 1918 मधील पराभवानंतर पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक निर्माण करण्यात आले. 


1943  : गब्बर सिंह अर्थात अमजद खान यांचा जन्म 


शोले चित्रपटातील गब्बर सिंह या भूमिकेने आजरामर झालेल्या अमजद खान (Amjad Khan) यांचा जन्म 1943 मध्ये, फाळणीपूर्वी लाहोरमध्ये झाला. भारतीय चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते जयंत यांचे ते पुत्र होते. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता शोले (Sholay). या चित्रपटातील गब्बरसिंगची भूमिका आजरामर केली. आजही त्यांना या भूमिकेसाठी ओळखले जाते. 


अभिनय जगतात येण्यापूर्वी अमजद के. आसिफसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. असिस्टंट म्हणून काम करत असताना त्यांनी पहिल्यांदा कॅमेऱ्याचा सामना केला. के. आसिफच्या लव्ह अँड गॉड नंतर अमजद खान यांनी चेतन आनंदच्या हिंदुस्तान की कसम या चित्रपटात पाकिस्तानी पायलटची भूमिका केली. या दोन्ही भूमिका अशा होत्या की त्या प्रेक्षकांच्या किंवा खुद्द अमजद खानच्याही लक्षात राहिल्या नाहीत. त्यामुळे शोले हा अमजदचा पहिला चित्रपट मानला जातो.


शोले व्यतिरिक्त अमजद खानने कुर्बानी, लव्ह स्टोरी, चरस, हम किसी से कम नहीं, इंकार, परवरिश, शतरंज के खिलाडी, देस-परदेस, दादा, गंगा की सौगंध, कसमे- वादे, मुक्कदर का सिकंदर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लावारीस, हमारे तुम्हारे, मिस्टर नटवरलाल, सुहाग, कालिया, लेडीज टेलर, नसीब, रॉकी, यतना, सम्राट, बागवत, सत्ते पे सत्ता, जोश अशा अनेक चित्रपटात काम केलं. 


1946  : मदन मोहन मालवीय यांचा मृत्यू (Pandit Madan Mohan Malaviya) 


महान स्वतंत्रता सेनानी आणि समाजसुधारक मदन मोहन मालवीय यांचा आजच्याच दिवशी 1946 साली मृत्यू झाला होता. मालवीय यांचा जन्म पंडित बैजनाथ आणि मुना देवी मालवीय यांच्या ब्राह्मण कुटुंबात 25 डिसेंबर 1861 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे पूर्वज मूळचे सध्याचे मध्य प्रदेशातील मालवा (उज्जैन) येथील होते आणि म्हणूनच त्यांना मालवीय म्हणून ओळखले जाऊ लागले. मालवियांनी भारतीयांमध्ये आधुनिक शिक्षणाला चालना देण्यासाठी  काम केलं. त्यांनी वाराणसी येथे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली.    


1959 : केशवराव मारुतराव जेधे यांचा मृत्यू


स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा आजच्याच दिवशी 1959 साली मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 9 मे 1886 रोजी झाला होता. पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याचे श्रेय जेधे यांना द्यावे लागेल. अस्पृश्यांच्या अनेक चळवळींत त्यांनी भाग घेतला. राजकारणात असूनही त्यांनी या नात्याने विपुल लेखन केले. महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदेचे ते अध्यक्ष होते.
 
1969:  इंदिरा गांधी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी


पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये मोठी दुही निर्माण झाली. पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना पक्षांतर्गत विरोध वाढू लागला होता. शेवटी काँग्रेसमधील मोरारजी देसाई गटाने इंदिरा गांधी यांची पक्षातून हकालपट्टी केली.  व्ही व्ही गिरी या अपक्ष उमेदवाराने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या निलम संजीव रेड्डी यांचा पराभव केला. त्यामागे इंदिरा गांधी यांचा हात होता. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्याविरोधात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी कारवाई केली आणि त्यांची काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वावरून हकालपट्टी (Expulsion of Indira Gandhi from Congress)  केली. त्यानंतर काँग्रेसची दोन गटात विभागणी (Split In Congress) झाली. 
 
1998 : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी ‘पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन’ (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले. 15 सप्टेंबर 2002 पासून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली.


2000: 12 नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1947 साली याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरुन भाषण प्रसारित झाले होते.


2005 : प्रा. मधू दंडवते यांचा मृत्यू 


समाजवादी नेते, अर्थतज्ज्ञ व समाजसेवक प्रा. मधू दंडवते यांचा मृत्यू आजच्याच दिवशी 2005 साली झाला. समाजवादी नेते प्रा. मधू दंडवते यांची एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ख्याती होती. 1971 ते 1990 एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1978 साली जनता पक्षाच्या राजवटीत रेल्वेमंत्री, 1989 साली व्ही. पी. सिंग सरकारमध्ये अर्थमंत्री आणि 1990 साली देवगौडा पंतप्रधान असताना नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदी त्यांनी काम केले. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील क्रांतिकारक निर्णय दंडवतेंनी घेतला. सेकंड क्लासच्या बाकांना दोन इंच कुशनची सोय दंडवतेंनी करून दिली. दंडवतेंच्या याच निर्णयामुळे आजही लाखो-करोडो गरीब लोक सेकंड क्लास मधून आरामदायक प्रवास करू शकतात. 
 
ही बातमी वाचा: