Onion Tomato News : सध्या पाकिस्तानात (Pakistan) पुरानं (Flood) थैमान घातलं आहे. पुरामुळं पाकिस्तानातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं आरोग्याच्या संकटाबरोबरच अन्नधान्याच्या टंचाईची समस्या देखील निर्माण झाली आहे. पुराममुळं येथील शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं पाकिस्तानात प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळं पाकिस्तानात कांदा आणि टोमॅटोची निर्यात त्वरित सुरु करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीनं केली आहे.
अनिल घनवटांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पाकिस्तानात कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. पुरामुळं तेथील महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळं भारतातून कांदा आणि टोमॅटोची आयात करण्याची मागणी होत आहे. भारतानं तातडीनं निर्यात सुरु करुन भारतातील कांदा आणि टमाटे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी केली केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
पाकिस्तानात कांद्याचे दर 400 रुपये प्रति किलोवर तर टोमॅटोचे दर 500 रुपयांवर
पाकिस्तानात अतिवृष्टी आणि महापुरांमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परिणामी पाकिस्तानात कांद्याचे दर 400 रुपये प्रति किलो तर टोमॅटोचे दर हे 500 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. हे दर 700 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानातील व्यापारी वर्ग, भारतातून कांदा आणि टोमॅटोची आयात करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे करत आहेत. भारतात मात्र कांद्याचे आणि टोमॅटोचे दर हे अद्यापही उत्पादन खर्चपेक्षा कमी आहेत. कांदा चाळींमध्ये सडत आहे. तर टोमॅटो रस्त्यावर फेकले जात आहेत. अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानला कांदा आणि टोमॅटोची निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी भारतातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती अनिल घनवट यांनी सांगितली.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निर्यात सुरु करावी
भारतात कांदा आणि साखरेचे दर नियंत्रित करण्यासाठी अनेक वेळा भारतानं पाकिस्तानातून कांदा आणि साखरेची आयात केली आहे. सीमेवर कारगिलचे युद्ध सुरु असताना मोठ्या प्रमाणात साखरेची आयात करण्यात आली होती. भारतानं पाकिस्तानला मदत करण्याचा हेतूने नव्हे तर भारतातील कांदा, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निर्यात सुरु करावी, अशी मागणी घनवट यांनी केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री पियुष गोयल यांना अनिल घनवट यांनी पत्र लिहलं आहे. त्यामुळं अनिल घनवटांच्या मागणीला यश येणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: