नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीनिमित्त जोरदार प्रचार सुरु आहे. नेहमीप्रमाणे यंदादेखील प्रचारावेळी जातीचं राजकारण केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःला मागास वर्गातील संबोधले होते. यावरुन माध्यमांच्या प्रतिनिधींनी आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना प्रतिक्रिया विचारली, त्यावर प्रियांका गांधी म्हणाल्या की, मला अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जात माहित नाही.


प्रियांका गांधी म्हणाल्या की, मला अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जात माहित नाही. विरोधी पक्षाने कधीही याबद्दल कोणतेही विधान केलेले नाही.

यावेळी प्रियांका यांनी नरेंद्र मोदींना राष्ट्रवादावरुन लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, जनता आवाज उठवते तेव्हा हे लोक (सत्ताधारी) ऐकायलादेखील तयार नाहीत. मला समजत नाही की हा कसला राष्ट्रवाद आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी एका प्रचारसभेत म्हटले होते की, मी मागास जातीतला असल्यामुळे विरोधकांना मी पंतप्रधान म्हणून मान्य नाही. त्यानंतर काल उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे आयोजित प्रचारसभेत मोदींनी पुन्हा एकदा त्यांच्या जातीवरुन भाष्य केले.

मोदी म्हणाले की, मी इतक्या मागास जातीतला आहे, की आमच्याकडे गावात घरही नव्हतं. मी मागासलेल्या नव्हे तर अती मागासलेल्या जातीत जन्मलो आहे. तुम्ही लोक (विरोधक) मला बोलायला लावत आहात, म्हणून मी जातीबद्दल बोलतोय. नाहीतर मी या राजकारणात न पडणारा व्यक्ती आहे.