भोपाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या विरोधी उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जोरदार टोला लगावला आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की, "साध्वी प्रज्ञा यांनी जर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला शाप दिला असता, तर भारताला सर्जिकल स्ट्राईक करावा लागला नसता."


काही दिवसांपूर्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरेंबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. साध्वी म्हणाल्या होत्या की, "हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला." याप्रकरणी साध्वींना निवडणूक आयोगाने नोटीसदेखील बजावली होती. याच वक्तव्यावरुन दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा यांना लक्ष्य केले आहे.

दिग्विजय सिंह म्हणाले की, "प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या होत्या की, त्यांच्या शापामुळे एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. त्याचप्रमाणे ठाकूर यांनी दहशतवादी संघटना जैश...चा म्होरक्या असलेल्या मसूद अजहरलादेखील शाप द्यायला हवा होता. ठाकूर यांनी तसे केले असते, तर आपल्या जवानांना सर्जिकल स्ट्राईक करावाच लागला नसता."

दिग्विजय सिंह म्हणाले की, "भाजपला जेव्हा समजले की, मी भोपाळमधून निवडणूक लढणार आहे, तेव्हापासून हे भाजपवाले घाबरले आहेत. मामासुद्धा (शिवराजसिंह चौहान) मला घाबरले आहेत. मी भोपाळमधून निवडणूक लढतोय, त्यामुळे उमा भारती यांनी या मतदार संघातून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे."