भोपाळ :  मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये 30 सप्टेंबरपासून 72 तासांची भू-समाधी घेणारे बाबा पुरुषोत्तमानंद आज सकाळी अकराच्या सुमारास बाहेर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. सात फूट खोल अशा खड्ड्यात बाबा पुरुषोत्तमानंद यांनी समाधी घेतली आहे. 


भाविकांना चमत्कार दाखवण्यासाठी समाधी घेतल्याचा दावा


सुरुवातीला बाबा पुरुषोत्तमानंद यांना भू-समाधीसाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र शपथपत्र दिल्यानंतर 30 सप्टेंबरला बाबा पुरुषोत्तमानंद खड्ड्यात समाधीसाठी उतरले. त्यानंतर या खड्ड्याला लाकडी पाटी आणि माती टाकून झाकण्यात आले. बाबा देवीभक्त असून भाविकांना चमत्कार दाखवण्यासाठी समाधी घेतल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. दरम्यान बाबा पुरुषोत्तमानंद यांनी समाधी घेतल्याचं समजताच या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली आहे.


भोपाळच्या टीटीनगरमध्ये राहणारे अशोक सोनी  उर्फ पुरूषोत्तमानंद महाराज माता मंदिराजवळील मॉं भद्रकली विजयासन दरबाराचे संस्थापक आहेत. त्यांचा मुलगा मित्रेश कुमार यांनी दावा केला आहे की, बाबांनी समाधीच्या अगोदर दहा दिवस अन्नत्याग केला होता. ते फक्त फळांचा ज्यूस घेत होते. 




पुरुषोत्तम महाराजांचे म्हणणे की, विश्वाच्या कल्याणासाठी आणि भगवंताच्या जवळ जाण्यासाठी त्यांनी  भू-समाधी घेतली. समाधी दरम्यान भक्त भगवंताच्या अधिक जवळ जातो. समाजहितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी महात्मा लोकांना अशी समाधी घ्यावी लागते. तसेच त्यांनी भू - समाधी अगोदर जल समाधी घेतल्याचा देखील दावा केला आहे. जल समाधी दरम्यान ते 12 तास पाण्यात होते. पुरूषोत्तम महाराजांना या अगोदर 1985 साली अग्नी स्नान देखील केले आहे. भोपाळच्या सोमवारा चौकात त्यांनी आपल्या शरीरावर पेट्रोल अंगावर ओतून आग लावली. या दरम्यान ते 80 टक्के जळाले होते, असा त्यांचा दावा आहे. परंतु त्यांच्या शरीरावर आगीचे कोणतेही निशाण नाही.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :