हरिद्वार (उत्तराखंड) : जेष्ठ पर्यावरणवादी प्रोफेसर जी.डी अग्रवाल उर्फ स्वामी सानंद यांचं उपोषणादरम्यान निधन झालं आहे. गंगा स्वच्छतेच्या मागणीसाठी गेल्या 111 दिवसांपासून ते उपोषण करत होते. पोलिसांनी उपोषणस्थळावरुन उचलल्यानंतर त्यांनी जलत्याग केला होता. हरिद्वारमधील ऋषीकेशच्या एम्स रुग्णालयात प्रा. अग्रवाल यांनी अखेरचा श्वास घेतला.


गंगा नदी परिसरात अवैध खाणकाम, धरणं, गंगेची स्वच्छता अशा गंगेसंबंधित विविध मुद्द्यांवर प्रा. जी. डी. अग्रवाल 22 जून 2018 पासून उपोषणाला बसले होते. त्यांनी गंगेच्या स्वच्छतेसंदर्भातील विविध मुद्दे अनेकदा सरकार दरबारी सुद्धा मांडले होते.

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून गंगेसाठी वेगळा कायदा बनवण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र कुठूनच योग्य प्रतिसाद न आल्याने त्यांनी 22 जूनपासून उपोषणाचा मार्ग अवलंबला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उमा भारती यांनी त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली होती. मात्र गंगेसाठी उपोषणावर ठाम राहण्याची भूमिका प्रा. जी. डी. अग्रवाल यांनी घेतली होती.

याआधीही प्रा. जी. डी. अग्रवाल गंगेच्या स्वच्छतेसाठी आमरण उपोषणावर बसले होते. 2012 सालीही त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्यावेळी मागण्यांवर सरकारने सकारत्मक भूमिका घेतल्याने प्रा. अग्रवाल यांनी उपोषण मागे घेतलं होतं.


आयआयटी प्राध्यापक ते स्वामी ग्यान स्वरुप सानंद, गंगेला वाहिलेल्या आयुष्याचा करुण अंत



स्वच्छ गंगेसाठी गेल्या 111 दिवसांपासून हरिद्वारमध्ये उपोषणावर असलेल्या प्रा. जी डी अग्रवाल यांचं आज निधन झालंय. 22 जूनपासून म्हणजे जवळपास गेल्या चार महिन्यांपासून ते उपोषणावर होते. कालच त्यांची प्रकृती बिघडायला लागल्यानंतर पोलिसांनी त्यांना ऋषिकेशच्या एम्स हाँस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण अग्रवाल यांनी अन्नत्यागानंतर, जलत्यागही सुरु केला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत जाऊन हाँस्पिटलमध्येच त्यांचा मृत्यू झालाय.

केंद्र सरकारनं स्वच्छ गंगेसाठी गंगा कायदा लागू करावा, गंगेच्या काठावर कुठलाही जलविद्युत प्रकल्प उभारला जाऊ नये या आणि अशा इतर अनेक मागण्यांसाठी त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केलं होतं. स्वच्छ गंगेसाठी भाषणं अनेक होतात, पण त्यासाठी आपले प्राण वेचण्याची तयारी जी डी अग्रवाल यांनी उपोषणाला बसतानाचा दाखवली होती. धक्कादायक म्हणजे इतके दिवस उपोषण सुरु असताना एकही केंद्रीय मंत्री त्यांना भेटायला गेला नव्हता. अविरल गंगेसंदर्भात काल केंद्र सरकारनं नोटिफिकेशन काढून यात जी डी अग्रवाल यांच्या बऱ्याच मागण्यांचा समावेश असल्याचा दावा केला होता. पण त्यांच्या उपोषणाचं काय याबद्दल मात्र फारसं कुणी बोलायला तयार नव्हतं.

आयआयटी प्रोफेसर ते महंत असा एक विलक्षण प्रवास त्यांच्या व्यक्तिमत्वात पाहायला मिळाला. 2011 साली त्यांनी हिंदू धर्मातलं गंगेचं महत्व जाणून महंतपदाची दीक्षा घेतली. स्वामी ग्यानस्वरुप सानंद असं त्यांचं नामाभिधान त्यानंतर झालेलं होतं. उपोषणाच्या दरम्यानच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना देशाच्या इतिहासात 1952 मध्ये घडली होती. पोट्टी श्रीरामलु यांनी स्वतंत्र आंध्राच्या मागणीसाठी आंदोलनातच आपलं बलिदान दिलं होतं. त्यानंतर हे आंदोलन चिघळलं आणि आंध्रप्रदेशची मागणीही पूर्ण झाली.


  • प्रो. जी डी अग्रवाल 86 वर्षांचे होते, 1932 मध्ये उत्तरप्रदेशातल्या मुझ्झफरनगर जिल्ह्यात त्यांचा जन्म

  • देशाच्या पर्यावरण आभियांत्रिकी क्षेत्रातलं मोठं नाव

  • आयआयटी रुरकी मधून त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं, त्यानंतर पर्यावरण अभियांत्रिकीमध्येही शिक्षण, कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी

  • मध्यप्रदेशातल्या चित्रकूटमध्ये ते सध्या राहत होते

  • गांधी विचारशैलीचं जीवनपद्धती त्यांनी स्वीकारली होती

  • चित्रकूटमध्ये दोन खोलीच्या झोपड्यांमध्येच त्यांचं वास्तव्य असायचं

  • स्वत:च झाडलोट करायची, स्वत:चे कपडे स्वत: धुवायचे, स्वत:चा स्वयंपाकही ते स्वत:च करायचे

  • प्रा. जी. डी. अग्रवाल हे पं. मदन मोहन मालविय यांनी 1905 साली स्थापन केलेल्या ‘गंगा महासभे’चे ज्येष्ठ कार्यकर्ते होते.

  • जी. डी. अग्रवाल हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य होते.

  • मध्य प्रदेशातील महात्मा गांधी चित्रकोट ग्रामोद्योग विश्वविद्यालयात पर्यावरणशास्त्र हा विषयही त्यांनी काही काळ शिकवला.