Goa Election Result 2022 : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी पक्षाने गोव्यातही एन्ट्री केली आहे. राजधानी दिल्ली आणि पंजाबनंतर आप पक्षाने गोव्यात एन्ट्री केली आहे. गोव्यात आप पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. केजरीवाल यांनी दोन्ही उमेदवाराच अभिनंदनही केले आहे. तसेच गोव्यात प्रमाणिक राजकारणाला सुरुवात झाल्याचे केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 


 






गोवा विधानसभेत आप पक्षाचे बाणावलीचे उमेदवार व्हिन्सी व्हिएगस यांनी जेष्ठ नेते चर्चिल आलेमाव यांचा पराभव केला आहे. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचा पराभब केल्याने व्हिन्सी व्हिएगस जायंट किलर ठरले आहेत. तर वेळळी मतदारसंघात क्रूझ सिल्वा यांनीही माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांचा पराभव केला आहे. गोव्यात केजरीवाल यांच्या आप पक्षाने दणक्यात एन्ट्री केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले असताना केजरीवाल यांच्या आप पक्षाने गोव्यात आपले खाते उघडले आहे. 


गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.  गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.   निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मत वाटा मिळालाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं मिळाली आहेत.  विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे 'नोटा'ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहे. 1.17% मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला आहे. 


मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा 500 मतांनी विजय
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला आहे. साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. सुरुवातीच्या कलांमध्ये प्रमोद सावंत पिछाडीवर होते, परंतु त्यांनी जोरदार मुसंडी मारुन विजय मिळवला. आतापर्यंतच्या कलामध्ये भाजपला 19 तर काँग्रेसला 12 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केला असून आजच शपथविधी होणार असल्याचं बोललं जात आहे.