कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा प्रचार जोमात सुरु असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रचारावर 24 तासांची बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही बंदी घातली आहे. सोमवारी रात्री 8 वाजेपासून मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत ममता बॅनर्जी प्रचार करु शकणार नाहीत. ममता बॅनर्ज यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. 


निवडणूक आयोगाच्या कारवाईवर ममता बॅनर्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाही आणि असंवैधानिक आहे.  या निर्णयाच्या निषेधार्थ मी उद्या दुपारी 12 वाजता कोलकाता येथील गांधी स्मारकाजवळ आंदोलन करणार आहे.






ममता बॅनर्जींवर निवडणूक आयोगाची कारवाई का?


केंद्रीय निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहे की, गेल्या काही दिवसांत ममता बॅनर्जी यांनी अशी दोन वक्तव्य केली आहेत ज्यामुळे राज्याचे वातावरण खराब होऊ शकते. म्हणूनच ही कारवाई केली जात आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना यापूर्वीही नोटीस बजावली आहे आणि त्याचे उत्तर न मिळाल्याने निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.


ममता बॅनर्जी यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  तसेच एका प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी हिंदू-मुस्लिम म्हणजे धर्माच्या आधारावर मतं मागितली होती. निवडणूक आयोगाने याबाबत ममता बॅनर्जी यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. मात्र ममता बॅनर्जींनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.