Eid-ul-Fitr 2022 : 'ईद उल फित्र' म्हणजेच 'रमजान ईद' जवळ आल्याने हैदराबादमध्ये नवीन छापील चलनी नोटांची मागणी वाढली आहे. प्रथा म्हणून मोठी मंडळी रमजाननंतर दरवर्षी ईदनिमित्त मुलांना पैसे भेट म्हणून देतात. यामुळे हैदराबादमध्ये नव्या करकरीत नोटांची मोठी मागणी आहे. ईदच्या दिवशी वडीलधाऱ्या व्यक्ती लहान मुलांना भेटवस्तू देतात. यामध्ये मुख्यत: पैसे भेट म्हणून दिले जातात. काही कुटुंबामध्ये अशी प्रथा आहे. यामुळे लोकांकडून नव्या करकरीत छापील नोटांना पसंती दिली जाते. परिणामी हैदराबादमध्ये नव्या छापील नोटांची मागणी वाढली आहे. 
 
लहान मुले अनेकदा त्यांच्या आजी-आजोबांकडून इतर नातेवाईकांना शुभेच्छा देत त्यांच्याकडून भेटवस्तू मागतात. जेव्हा लहान मुले ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जातात तेव्हा मोठी मंडळी मुलांना पैसे भेट म्हणून देतात. यावेळी अनेक जण नवीन छापलेल्या चलनी नोटा देण्यास प्राधान्य देतात. 


हैदराबादमधील एका कपड्याच्या दुकानातील कामगार मोहम्मद फरीदुद्दीन यांनी सांगितलं की, 'माझ्या लहानपणी 10 रुपयांची नवीन नोट मिळणं ही एक चांगली गोष्ट मानली जायची. माझ्या कुटुंबात आजही ही प्रथा आहे. सध्याच्या पिढीला 100 रुपयांची नोट मिळते. ही परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे.' 


नव्या छापील नोटांच्या मागणीमुळे जुन्या नोट बदलून नव्या नोटा देणाऱ्या एजंटमध्ये मोठी वाढ झाली आहे. कारण अनेक लोक ईद उल फित्रसाठी नव्या नोटा देण्यास पसंती दर्शवतात. त्यामुळे अनेक लोक जुन्या नोटा बदलून नव्या कुरकुरीत छापील नोटा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. यावेळी जन्या नोटा बदलून नव्या नोटा देणारे एजंट ठराविक कमिशन घेतात. यामुळे त्यांना मोठा फायदा होत आहे.


हैदराबादमधील बँकांमध्येही नवीन चलनी नोटांची व्यवस्था करण्याच्या अनेक ग्राहकांच्या मागण्यांचा पूर आला आहे. रमजानच्या सुरुवातीपासून अनेक ग्राहकांनी ही विनंती केली असून अजूनही अशी मागणी सुरुच आहे. एका मनी एक्सचेंजरने सांगितले की, 'रमझानमध्ये नवीन चलनी नोटांना मोठी मागणी आहे. आम्ही पाच ते दहा टक्के कमिशन घेतो. हे चलनावर अवलंबून असतं.' 


महत्त्वाच्या बातम्या :