Temperature In India : सध्या देशातील अनेक राज्यात उष्णतेची लाट आली आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एप्रिल महिना हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. भारताच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात एप्रिल महिन्याने मागच्या 122 वर्षांचा उष्णतेचा विक्रम मोडला आहे. 1901 नंतर या वर्षीचा एप्रिल महिना सर्वात उष्ण ठरला आहे. 


भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील एप्रिल महिन्यात तापमान हे 1901 नंतर सर्वाधिक होते. मे महिन्यातही उत्तर आणि पश्चिम भारतातील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. मे महिन्यात उत्तर-पश्चिम, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमान सामान्य स्तितीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण द्विपकल्पीय भारत आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये तापमान हे सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.


दरम्यान, आयएमडीचे डीजी मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, मे महिन्यात राजस्थान, गुजरात, दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये उष्ण वारे वाहत राहतील. या वर्षीचा एप्रिल महिना 1901 नंतर भारतातील सर्वाधिक उष्ण महिना होता. तर भारताच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात एप्रिल हा 122 वर्षांतील सर्वात उष्ण ठरला आहे. एप्रिल 1 ते 28 पर्यंत, वायव्य भारतात सरासरी तापमान 35.9 °C होते तर मध्य भारतात 37.78 °C होते.


जेव्हा कमाल तापमान हे 40 अंशांपेक्षा जास्त असते, तेव्हा उष्णतेची लाट असल्याचे सांगितले जाते. भारतीय हवामान विभागानुसार, जेव्हा एखाद्या क्षेत्रात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस नोंदवते तेव्हा एक धोकादायक उष्णतेची लाट घोषित केली जाते. कमाल तापमान 47 अंशांच्या पुढे गेल्यावर तीव्र उष्णतेची लाट घोषित केली जाते.  दरम्यान, उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये तापमान हे नियमितपणे 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मे च्या मध्यापासून वादळे येऊ शकतात अशी माहिती महापात्रा यांन दिली आहे. एप्रिलमध्ये पाच वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाले होते, परंतू त्यापैकी एकही मजबूत नव्हता आणि त्यामुळे पाऊस पडला नाही.  दरम्यान, दक्षिण, मध्य आणि पूर्व भारतात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाजही महापात्रा यांनी सांगितला आहे.