मुंबई : आज देशभरात ईद-उल-फित्र (रमजान ईंद) साजरी केली जात आहे. जामा मशीदेचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मंगळवारी चंद्र दिसल्याचे जाहीर केले. त्यासोबतच देशभरात ईदची घोषणा करण्यात आली. इस्लामी कॅलेंडरनुसार रमजानचा महिना संपल्यानंतर ईद साजरी केली जाते. सऊदी अरबमध्ये काल (मंगळवारी) ईद साजरी करण्यात आली.


कोलकाता, वाराणसी आणि आसामसहीत देशभरातील अनेक ठिकाणी ईदचा चंद्र पाहिला गेला. त्यामुळे रमजानचा महिना संपला आहे. रमजान काळातील रोजे (उपवास) ठेवल्यानंतर हा सण साजरा केला जातो. यावर्षी रमजानचा महिना 7 मे रोजी सुरु झाला असून 4 जून रोजी संपला. यादरम्यान मुस्लीम बांधवांनी एकूण 29 रोजे ठेवले.

रमजान हा इस्लामी कालगणनेनुसार 9 वा महिना आहे. चंद्र दर्शनानंतर दिवस व महिना बदलल्याने शव्वाल महिन्याच्या (10 व्या महिन्याच्या) पहिल्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. ईदगाहमध्ये तसेच मशीदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात येते. मुंबईत आझाद मैदानात ही नमाज अदा करण्यात येणार आहे.

ईद-उल-फित्र हा मुस्लीम धर्मातील एक पवित्र सण आहे. जगभरात ईदचा चंद्र दिसल्यानंतर मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुस्लीम बांधव ईदगाहजवळ (कोणतीही स्वच्छ जागा) एकत्र जमून नमाज अदा करतात. नमाजनंतर सर्व बांधव एकमेकांना मिठी मारुन ईदच्या शुभेच्छा देतात.

रमजानला बरकतचा महिना मानले जाते. इस्लाममध्ये हज, रोजा, नमाज, कलमा आणि जकात या सुन्नत (पवित्र) गोष्टी आहेत. त्यात या महिन्यात उपवासासोबत (रोजा) अल्लाहची आराधना केली जाते. कोणी 7 कोणी 10 तर कोणी महिनाभर एका खोलीतच बसून राहून अल्लाहची ईबादत करतात. म्हणून बरकतसहित हा महिना ईबादतचा मानला जातो. शिवाय या महिन्यामध्ये आपल्या वर्षभराच्या कमाईचा काही भाग गरिबांमध्ये दान (जकात)केला जातो. त्याचबरोबर आर्थिक दूर्बल असलेल्या लोकांना धान्य वाटप केले जाते, त्यास फित्रा असे म्हणतात. म्हणून या ईदला ईद-उल-फित्र असे म्हटले जाते.