मुंबई: यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी (Abdel Fattah El Sisi) भारत दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांचा हा तिसरा भारत दौरा असून या दरम्यान भारत आणि इजिप्तमध्ये वेगवेगळे करार होणार आहेत. 


राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान या दोन देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. 26 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या सोहळ्याला ते उपस्थित राहतील आणि विविध उद्योग प्रतिनिधींशी संवादही साधतील. द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्यादरम्यान चर्चा होणार आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 


 






इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यापूर्वी दोनदा भारतात आले आहेत. ऑक्टोबर 2015 साली तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि नंतर सप्टेंबर 2016 मध्ये ते भारत दौऱ्यावर आले होते. 


भारत आणि इजिप्तचे संबंध 


परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे दोन देश सस्कृतीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले आहेत. आंतराष्ट्रीय स्तरावरही हे दोन देश एकमेकांशी सहकार्य करत समान मुद्द्यांवर काम करताना दिसत आहेत. अलिप्ततावादी चळवळीमध्ये भारताचे त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल गमाल नासेर यांनी एकत्रित काम करत सहकार्याची भूमिका घेतली होती. तीच सहकार्याची भूमिका आताही कायम आहे. 


परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 50 हून अधिक भारतीय कंपन्यांनी इजिप्शियन अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये सुमारे 3.15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यामध्ये कृषी, व्यवसाय, ऊर्जा, रसायने, वस्त्रे आणि कापड या उद्योगांचा समावेश आहे. भारत आणि इजिप्त या दोन्ही देशांमधील व्यापार संतुलित आहे आणि 2021-22 मध्ये 7.26 अब्ज डॉलर्स इतक्या उच्च पातळीवर पोहोचला आहे. यामध्ये भारताने 3.74 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे तर 3.52 अब्ज डॉलर्सची आयात केली आहे. 


ही बातमी वाचा: