Ramoji Group Founder Ramoji Rao Passes Away: नवी दिल्ली : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक (Ramoji Group Founder) रामोजी राव (Ramoji Rao) अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थानं त्रस्त होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांचं निधन झालं आहे. शनिवारी (आज) 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता त्यांचं निधन झालं. रामोजी राव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या रामोजी फिल्मसिटी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.
रामोजी समुहाचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन झालं असून गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 5 जून रोजी प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शनिवारी 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता निधन झालं आहे.
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांना 'आयकॉनिक मीडिया बॅरन' आणि 'फिल्म मोगल' असं म्हटलं जायचं. त्यांचं पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होतं. ते 87 वर्षांचे होते. उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना 5 जून रोजी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. रामोजी राव रामोजी ग्रुपचे अध्यक्ष होते. रामोजी ग्रुपच्या पंखाखाली जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ रामोजी फिल्म सिटी, मार्गदर्शी चिटफंड, ईनाडू तेलुगू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, प्रिया फूड्स, डॉल्फिन हॉटेल्स, उषाकिरण मुव्हीज एवढं मोठं साम्राज्य त्यांनी उभारलं. रामोजी ग्रुपचं मुख्यालय हैदराबादेत आहे. रामोजी राव यांचे चिरंजीव सुमन ईटीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
कॅन्सरवरही केलेली मात
5 जून रोजी रामोजी राव यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. तसेच, त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्या हृदयात स्टेंट टाकला आणि त्याला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं. विशेष म्हणजे, रामोजी राव यांना काही वर्षांपूर्वी कोलन कॅन्सर झाला होता. पण कॅन्सरवर मात करुन ते त्यातून पूर्णपणे बरे झाले होते.