Edible Oil Price : महागड्या खाद्यतेलाच्या किमतीतून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण देशात लवकरच खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती घसरल्या असून, त्यानंतर देशात खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खाद्य तेलाच्या किंमती घसरल्या तर सर्वसामान्यांचा दिलास मिळणार आहे. आधीच महागाई वाढली असताना त्यात खाद्य तेलाच्या किंमती गगणाला भिडल्याने सर्व सामान्यांच कंबरडे मोडले होते. 


अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्टीय बाजारात खाद्य तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. याचा फायदा देशांतर्गत बाजारात दिसून येईल. त्यामुळे आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये विदेशी बाजारात खाद्यतेलाच्या किमती घसरल्या आहेत. परंतु, त्यानुसार देशांतर्गत बाजारात तेलाचे भाव कमी झालेले नाहीत. हिवाळ्यात आणि लग्नसोहळ्यात तेलाची मागणी वाढल्याने देशांतर्गत बाजारातील किरकोळ किमतीत कोणताही दिलासा मिळालेला नाही. परंतु, येत्या काळात तेलाच्या किंमती कमी होऊ शकतात.
  
किरकोळ आणि घाऊक बाजारात सूर्यफूल व सोयाबीन तेलाची आयात किमतीच्या तुलनेत मोठ्या फरकाने विक्री होत आहे. सूर्यफूल तेल हे  25 टक्के जास्त दराने विक्री होत आहे. तर  सोयाबीन तेलाची विक्री सुमारे 10 टक्क्यांनी अधिक होत आहे. परदेशी बाजारात सूर्यफूल तेलाचा दर सोयाबीन तेलापेक्षा 35 डॉलर प्रति टन झाला आहे. सूर्यफूल तेलात तेजी येण्याचे कारण म्हणजे स्थानिक उत्पादनाचा अभाव आणि कोटा पद्धतीमुळे आयात पुरेशा प्रमाणात होत नाही. पुरवठा कमी असल्याने सोयाबीन तेल सुमारे 10 टक्क्यांनी महागले आहे.
 
अर्थसंकल्पापूर्वीच शेतकरी संघटनांनी खाद्यतेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या मागण्या केल्या आहेत. सरकारने पामतेलऐवजी सोयाबीन, मोहरी, भुईमूग आणि सूर्यफूल या स्थानिक तेलबियांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा, जेणेकरून खाद्यतेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन किमती नियंत्रणात ठेवता येतील, असे विविध संघटनांचे मत आहे.


सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SIA) ने खाद्यतेलाच्या आयातीवर भारताच्या खर्चाची माहिती दिली आहे. ऑक्टोबर 2022 ला संपलेल्या तेल वर्षात आयातीवरील खर्च 34.18 टक्क्यांनी वाढून 1.57 लाख कोटी रुपये झाला आहे. जगातील प्रमुख वनस्पती तेल खरेदीदार भारताने 2020-21 या वर्षात 1.17 लाख कोटी रुपयांचे 131.3 लाख टन खाद्यतेल आयात केले आहे.


महत्वाच्या बातम्या


वृद्धाश्रमात जागा नसणाऱ्यांना राज्यपाल नेमलं, केंद्राने हे 'सँपल' परत न्यावं अन्यथा इंगा दाखवू; उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा