Human trafficking of Indians to America via Canada : कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी होत असल्याचा भारताच्या केंद्रीय तपास संस्थेला (ईडी) संशय आहे. ईडीला या प्रकरणात कॅनडातील 260 महाविद्यालयांचीही संशयास्पद भूमिका आढळली आहे. हा गुन्हा आंतरराष्ट्रीय सिंडिकेट करत असल्याचे ईडीने सांगितले. 3 वर्षांपूर्वी 2022 मध्ये कॅनडामार्गे बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करताना एका गुजराती कुटुंबाचा मृत्यू झाला होता. ज्या तस्करांनी त्यांना सीमेपलीकडे नेले होते त्यांनी त्यांना उणे 37 अंश सेल्सिअसच्या बर्फाच्या वादळाच्या मध्यभागी सोडले होते.


मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथे 8 ठिकाणी शोध मोहीम


अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरमध्ये भावेश अशोकभाई पटेल आणि इतर काहींना प्रिव्हेंटिव्ह मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत आरोपी करण्यात आले होते. ईडीच्या अहमदाबाद प्रादेशिक कार्यालयाने 10 आणि 19 डिसेंबर रोजी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथे 8 ठिकाणी शोध मोहीम राबवली.


प्रति व्यक्ती 55 ते 60 लाख रुपये घेतात


हे तस्कर प्रथम कॅनडाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात, असे ईडीच्या तपासात समोर आले आहे. यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती कॅनडामध्ये पोहोचते तेव्हा ते त्याला बेकायदेशीरपणे सीमा ओलांडायला लावतात आणि अमेरिकेला पाठवतात. या सर्व कामासाठी हे आरोपी प्रति व्यक्ती 55 ते 60 लाख रुपये घेतात, असे तस्करांकडून सांगण्यात आले. मुंबई आणि नागपुरातील दोन एजंट दरवर्षी सुमारे 35 हजार लोकांना अवैधरित्या परदेशात पाठवतात, असेही झडतीदरम्यान समोर आले.


या रॅकेटमध्ये एकट्या गुजरातमधील 1700 एजंट आणि भारतभरातील सुमारे 3,500 एजंट सामील होते. त्यांच्यावर कारवाई केल्यानंतरही आठशेहून अधिक एजंट या कामात गुंतले आहेत. कॅनडातील सुमारे 260 महाविद्यालयेही या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनमध्ये जाण्यासाठी लोक डंकी रुट अवलंबतात. भारत ते अमेरिकेचे अंतर सुमारे 13,500 किमी आहे. विमानाने येथे पोहोचण्यासाठी 17 ते 20 तास लागतात. मात्र, डंकी मार्गाने हे अंतर 15 हजार किमीपर्यंत पोहोचते आणि या प्रवासाला काही महिने लागतात.


इतर महत्वाच्या बातम्या