नवी दिल्ली : सरकारकडून राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांची यादी (Ease of Living Index) जारी करण्यात आली आहे. यामध्ये देशातील 111 शहरांपैकी कर्नाटकची राजधानी आणि टेक सिटी म्हणून प्रसिद्ध असणारं बंगळुरु हे शहर राहण्याओग्य सर्वोत्तम शहर आहे.  या यादीत पुणे दुसऱ्या स्थानावर आहे. तर टॉप 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. मात्र देशाची राजधानी नवी दिल्लीचा टॉप 10 शहरांमध्ये नाही.


'इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स' पहिल्यांदा 2018 मध्ये जारी करण्यात आला होता. या सर्वेक्षणात प्रशासन, शिक्षण, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या अनेक गोष्टींच्या आधारवर प्रश्न विचारले जातात.


सरकारने जारी केलेल्या इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्समध्ये पुणे दुसऱ्या आणि अहमदाबाद तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय चेन्नई, सूरत, नवी मुंबई, कोयंबतूर, बदोडा, इंदूर आणि ग्रेटर मुंबईचा समावेश टॉप 10 शहरांमध्ये करण्यात आला आहे. तर '10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या' या श्रेणीत जीवन सुगमता निर्देशांकामध्ये सामील 49 शहरांमध्ये दिल्ली तेराव्या आणि श्रीनगर सर्वात खालच्या स्थानावर आहे.


केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही यादी जाहीर केली. निर्देशांकानुसार '10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहराच्या' श्रेणीत शिमला अव्वल स्थानावर आहे. या श्रेणीत भुवनेश्वर दुसऱ्या आणि सिल्वासा तिसऱ्या स्थानावर आहे. काकीनाडा, सेलम, वेल्लोर, गांधीनगर, गुरुग्राम, दावणगेरे आणि तिरुचिरापल्ली या श्रेणीत पहिल्या 10 शहरांमध्ये आहेत. एकूण 62 शहरांच्या या श्रेणीत मुजफ्फरपूर सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.


नगरपालिका कामगिरी निर्देशांक
तर नवी दिल्ली महानगरपालिकेने 10 लाखांपेक्षी कमी लोकसंख्येच्या श्रेणीत 'नगरपालिका कामगिरी निर्देशांक'मध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. या श्रेणीत तिरुपती, गांधीनगर, करनाल, सेलम, तिरुपूर, बिलासपूर, उदयपूर, झाशी आणि तिरुनेलवेली टॉप 10 मध्ये आहेत.


याशिवाय इंदूरने 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या श्रेणीत 'नगरपालिका कामगिरी निर्देशांक'मध्ये पहिलं स्थान काबीज केलं. या श्रेणीत दुसरं स्थान सूरत आणि तिसरं स्थान भोपाळने मिळवलं. पिंपरी चिंचवड, पुणे, अहमदाबाद, रायपूर, ग्रेटर मुंबई, विशाखापट्टणम आणि बडोदा या श्रेणीमध्ये टॉप 10 मध्ये आहेत.