Dumka Murder Case: झारखंडच्या दुमकामध्ये एका मुलीच्या हत्येच्या घटनेनंतर  (Dumka Murder Case) देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या मुद्यावरुन अनेक नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या असून आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. एकतर्फी प्रेमातून या 17 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. शाहरुख असं या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवला असून आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. 


तपास अधिकाऱ्याला हटवलं, आरोपीला कडक शिक्षा करा, सर्वपक्षीयांची मागणी


या प्रकरणावरुन राजकारण देखील तापलं आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पीडितेच्या परिवाराला दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच आरोपीला लवकरच कडक शिक्षा केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याच्या आरोप भाजपनं केला होता. यानंतर तपास अधिकारी DSP नूर मुस्तफा यांना हटवण्यात आले आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा दिली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ही घटना अमानवीय आहे. फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवून आरोपीला कडक शिक्षा केली जावी, अशी मागणी देखील ओवेसी यांनी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं या घटनेची दखल घेतली असून 8 दिवसात रिपोर्ट देण्याचं सांगितलं आहे. 
 
एकतर्फी प्रेमातून जाळून हत्या


झारखंडच्या दुमका जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून जाळून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. 22 ऑगस्ट रोजी  शाहरुखनं पीडितेला फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर दुसऱ्याच दिवशी आरोपी 23 तारखेला पहाटेच्या 5 वाजता मुलीच्या घरी गेला. सर्वजण झोपेत असताना मुलीच्या रुमच्या खिडकीतून पेट्रोल टाकत आग लावली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. पाच दिवस तिनं दवाखान्यात जगण्यासाठी संघर्ष केला. मात्र सोमवारी 29 तारखेला तिची प्राणज्योत मालवली.   


मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या घरच्यांनी म्हटलं आहे की, झारखंड सरकारकडून वेळेवर मदत मिळाली असती तर आमची मुलगी वाचली असती. आरोपी शाहरुखला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आरोपी शाहरुखला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत दुमकामधील काही संघटना देखील रस्त्यावर उतरल्या आहेत.   


आरोपी शाहरुख ड्रग अॅडिक्ट
आरोपी शाहरुख 23 वर्षांचा आहे. तो ड्रग्ज अॅडिक्ट असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच तो 5वी पर्यंतच शिकलेला आहे. दुमकामध्येच तो मजूरीचं काम करतो. मागील एक दीड वर्षापासून तो पीडितेचा पाठलाग करत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात शाहरुखसह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.