मुंबई : दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि देशातील इतर महानगरांतील रस्त्यांवरील अपघातांसाठी (Road Accidents) भटकी जनावरं (Stray Animals) कारणीभूत असल्याचा दावा एका विमा कंपनीने (Insurance Company) केला आहे. देशातील आघाडीची विमा कंपनी असलेल्या अॅकोच्या 'अॅको अॅक्सिडेंट इंडेक्स' (ACKO Accident Index) मध्ये हा दावा करण्यात आला असून रस्त्यांवरील कुत्र्यांमुळे (Stray Dogs) 58.4 टक्के अपघात होत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. आश्चर्यकारक म्हणजे उंदरांमुळे (Rat) 11.6 टक्के अपघात होत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. हा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. 


देशातील आघाडीची विमा कंपनी असलेल्या अॅकोकडे (ACKO Accident Index) जानेवारी ते जून या दरम्यान अपघातासंबंधी आलेल्या 1.27 लाख क्लेमचा संदर्भ या अहवालासाठी वापरण्यात आला आहे. या वाहन चालकांनी त्यांच्या वाहनाच्या अपघातासाठी भटक्या जनावरांना कारणीभूत ठरवलं आहे. 


या अहवालात देशातील प्रमुख दहा महानगरांमध्ये होणाऱ्या अपघातांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये दिल्लीमध्ये अपघाताचा दर हा 20.3 टक्के तर मुंबईमध्ये 18.2 टक्के इतका आहे. भटक्या कुत्र्यांमुळे 58.4 टक्के, भटक्या गायींमुळे 25.4 टक्के तर उंदरांमुळे 11.6 टक्के अपघात होत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. चेन्नईमध्ये भटक्या जनावरांमुळे सर्वाधिक म्हणजे तीन टक्के अपघात झाले असून दिल्ली आणि बंगळुरुमध्ये हे प्रमाण दोन टक्के इतकं आहे. 


अपघातासाठी भटक्या जनावरांसोबतच रस्त्यांवरील खड्डे, वेगाने गाडी चालवणे तसेच दारू पिऊन वाहन चालवणे ही कारणंदेखील आहेत असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. देशाची राजधानी दिल्लीतील सेक्टर 12 म्हणजे नोएडा आणि मुंबईतील घाटकोपर पश्चिम ही ठिकाणं सर्वाधिक अपघाताची ठिकाणं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. महानगरांचा विचार करता बंगळुरुची स्थिती सर्वात चांगली आहे. 


अॅको अॅक्सिडेंट इंडेक्स (ACKO Accident Index) बाबत बोलताना या संस्थेचे वरिष्ठ अधिकारी अनिमेश दास यांनी म्हटलं की, रस्त्यांवर अपघात झाला की आपण खराब रस्त्यांना दोष देतो. या संबंधी योग्य उपाययोजना केल्यास अपघाताचे हे प्रमाण कमी करता येऊ शकते. 


महत्त्वाच्या बातम्या :