Monsoon Updates : यंदाच्या वर्षी लवकर येणार म्हणता म्हणता मान्सूननं (Monsoon) हवामान खात्याला चांगलंच तोंडघशी पाडलंय. कर्नाटकात (Karnataka) दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.


अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यानं अगदी हैराण केलं आहे. अशातच सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण, राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्यून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे. 


मान्सून राज्यात आता तो 12 ते 13 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो 7 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला होता. 


राज्यात उष्णतेची लाट


महाराष्ट्रात मात्र उष्णतेची लाट (Heat Wave) कायम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. गोंदियात सर्वाधिक 45.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. 


उत्तरेकडील राज्य आणि मध्य भारतात मात्र कमाल तापमानात वाढ होऊन काही भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.