वाराणसी : वाराणसीतील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पुरूष आणि महिलांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. नव्या ड्रेसकोडनुसार, काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी पुरूषांना धोतर आणि कुर्ता तर महिलांना साडी परिधान करणं आवश्यक असणार आहे. पॅन्ट, शर्ट, जीन्स परिधान केलेल्या व्यक्तींना लांबून दर्शन घ्यावं लागणार आहे. म्हणजेच, त्यांना शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेता येणार नाही, अशी माहिती मिळत आहे.


काशी विश्वनाथांच्या सध्याचं मंदिर महाराणी अहिल्याबाई होळकरांनी 1780मध्ये बांधलं होतं. त्यानंतर महाराजा रणजीत सिंह यांनी 1853 मध्ये 1000 किलोग्रॅम शुध्द सोन्याने त्याचा कळस बांधला होता. काशीला भगवान शंकराची राजधानी म्हणून ओळखलं जातं. असं सांगितलं जातं की, स्वतः भगवान शंकराने निवडलं होतं आणि माता पार्वतीसोबत ते येथे निवास करतात.

श्री काशी विश्वनाथाचं स्पर्शदर्शन भाविकांना मंगला आरतीपासून मध्यान्ह आरतीपर्यंत मिळणार आहे. रविवारी मंदिर प्रशासन आणि काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मकर संक्रांतीनंतर नवी व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. जे पुरूष धोतर आणि कुर्ता आणि महिला साडी परिधान करतील त्यांनाच बाबा विश्वनाथाचं स्पर्शदर्शन करता येणार आहे. पॅन्ट, शर्ट, जीन्स परिधान केलेल्या व्यक्तींना फक्त लांबून दर्शन दिलं जाणार आहे.

विद्वत परिषदेच्या सदस्यांनी उज्जैनमधील महाकाल ज्योतिर्लिंग, रामेश्वरम आणि सबरीमाला या मंदिराचं उदाहरण दिलं आहे. महाकालच्या भस्म आरतीच्या वेळी बाबा स्पर्श करण्यासाठी न शिवलेलं वस्त्र परिधान करतात. इतर भाविक फक्त दर्शन आणि पूजा करतात. श्री काशी विश्वनाथ मंदिरातही ही नवी व्यवस्था लागू केली पाहिजे, असाही विद्वत परिषदेच्या सदस्यांनी सूचना केली आहे.

काशी विश्वनाथ ज्योर्तिंलिंग दोन भागांमध्ये आहे. उजव्या भागात शक्तिच्या रूपात देवी भगवती विराजमान आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिव वाम रूपात विराजमान आहेत. त्यामुळे काशीला मुक्त क्षेत्र म्हणूनही ओळखलं जातं. दरम्यान, विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी झालेल्या आक्रमणांमध्ये काशीचं मूळ मंदिर पाडण्यात आलं होतं. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता.

संबंधित बातम्या : 

#JNUviolence : मास्कधारी चेक्स शर्ट असणाऱ्या मुलीची ओळख पटली; दिल्ली क्राईम ब्रान्चची माहिती

व्हीआयपी सुरक्षेतून NSG कवच पूर्णत: हटवण्याचा सरकारचा निर्णय

तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींच्या फाशीची तालिम; 22 जानेवारीला देण्यात येणार फाशी