नवी दिल्ली : केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षेमधून एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड) कवच हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच गांधी कुटुंबाचं एसपीजी कवच हटवल्यानंतर आणि व्हीआयपी सुरक्षेत कपात केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवादविरोधी विशेष पथकातील जवान अर्थात 'ब्लॅक कॅट' कमांडोंना सुमारे दोन दशकानंतर व्हीआयपी सुरक्षा ड्यूटीवरुन हटवण्यात येईल.
एनएसजीची स्थापना 1984 मध्ये झाली होती. तेव्हा या पथकाच्या मूळ कामात व्हीआयपी सुरक्षेचा समावेश नव्हता. एनएसजी कमांडो सध्या 'झेड-प्लस' कवच असलेल्या 13 हायप्रोफाईल व्यक्तींना सुरक्षा देतात. या सुरक्षा कवचामध्ये अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज सुमारे दोन डझन कमांडो प्रत्येक व्हीआयपीच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "ही जबाबदारी लवकरच निमलष्करी दलाकडे सोपवण्यात येईल. गृहमंत्रालयाचं मत आहे की, एनएसजीचं मूळ काम हे दहशतवाद रोखणं, विमान अपहरणाविरोधात अभियान राबवणं हे आहे. मात्र व्हीआयपींच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या निर्धारित आणि विशिष्ट क्षमतांवर ओझं आहे. व्हीआयपींचं एनएसजी कवच काढण्याच्या निर्णयामागे हेच कारण आहे."
कोणाकोणाला एनएसजी कवच आहे?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे एनएसजी कवच आहे. याशिवाय उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही एनएसजी कवच आहे.
मुक्त झालेल्या एनएसजी जवानांना नव्या ठिकाणी नियुक्ती
व्हीआयपी सुरक्षेमधून एनएसजी कवच हटवल्यानंतर सुमारे 450 कमांडो त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होणार आहेत. त्यांना दुसऱ्या ठिकाणी तैनात केलं जाईल. देशातील एनएसजीच्या पाच तळांमध्ये त्यांची नियुक्ती होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. एनएसजी कवच हटल्यानंतर, संबंधित व्हीआयपींच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ आणि सीआयएसएफला दिली जाऊ शकते. हे दोन्ही दल 130 प्रमुख लोकांना संयुक्तरित्या सुरक्षा देतात.
सीआरपीएफ-सीआयएसएफकडे अनेक व्हीआयपींच्या सुरक्षेची जबाबदारी
सीआरपीएफकडे नुकतीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि त्यांच्या पत्नी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पाचही जणांना यापूर्वी एसपीजी सुरक्षा होती. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याही सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे आहे. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अन्य प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे आहे.